Sudhir mungantiwar: “एकनाथ शिंदेंना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच!” सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
 एकनाथ शिंदे नाराज झाले, तर मोठा राजकीय स्फोट होईल, असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांच्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांना नाराज करण्याचा प्रश्नच येत नाही, मग अशा काल्पनिक कथा कशासाठी?असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असतानाच, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना सत्तेला लाथ मारली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवून भाजपला मदत केली, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबत भाजपची भूमिका नकारात्मक असण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनासोबतच एकनाथ शिंदे यांचीही सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची मदत झाली आहे. त्यामुळे शिंदे यांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे!’ असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत स्पष्ट संदेश दिला.