Tiger Attack: गुराख्यावर वाघाचा जीवघेणा हल्ला; गुराखी जखमी

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात समोर आली आहे. या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील विहीरगाव-घनोटी येथील जंगलात ही थरारक घटना घडली आहे. साईनाथ मांडवगडे असे या जखमी गुराख्याचे नाव असून तो घनोटी गावातीलच रहिवासी आहे.


दररोजच्याप्रमाणे साईनाथ हे आपल्या ताब्यातील गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. यादरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक अचानक हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात साईनाथ गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी हलवले.


या सततच्या घटनांमुळे विहीरगाव-घनोटी परिसरासह जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने या घटनेची दखल घेऊन संबंधित परिसराची पाहणी करावी आणि या हल्लेखोर वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी संतप्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.