Chandrapur News: चिवड्यात आढळली पाल; नागरिकांना विषबाधा, रुग्णालयात दाखल

Bhairav Diwase

वरोरा:- 
वरोरा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या लोकप्रिय 'मनोज चिवडा सेंटर'मधून खरेदी केलेल्या चिवड्यात चक्क पाल आढळली आहे. हा चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल ७ जणांची प्रकृती अचानक बिघडली, ज्यामुळे वरोरा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 


सर्व बाधित नागरिकांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची गंभीर दखल घेत वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने माहिती घेतली. 


या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित दुकानदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'मनोज चिवडा सेंटर'वर प्रशासनाकडून तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आणि अशा अन्नपदार्थ विक्रेत्यांची कसून चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी आता संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.