Top News

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा झाले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू.


Bhairav Diwase.     March 25, 2021
गडचिरोली:- दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पदावर असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून रिक्त होते गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरूपद

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर २०२० रोजी संपला. पण कोरोना संकटामुळे या रिक्त पदावरील नियुक्ती रखडली होती. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. अखेर डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. रिक्त पद भरण्यात आले.

डॉ. राजेंद्र कुमार शर्मा झाले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू.......

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बंगळुरू येथील संचालक डॉ. एस माधेश्वरन आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या समितीचे सदस्य होते. या समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केल्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धीपत्रक काढून निर्णय जाहीर करण्यात आला. लवकरच डॉ. राजेंद्र कुमार शर्मा गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी तसेच या विद्यापीठात शिकणारे जास्तीत जास्त विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी व्हावेत यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. राजेंद्र कुमार शर्मा करणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने