Top News

उड्डाणपूल संदर्भात व्यापारी आक्रमक #chandrapur #Korpana #Gadchandur


नागरिकांनी एक तास वाहतूक रोखून धरली


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा ते गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग 353 चे काम सूरू आहे. या महामार्गावर विराजमान औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मोठी बाजारपेठ व 45 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहर येथे स्थानिक "समाधान पुर्ती बाजार ते वीर बाबुराव शेडमाके" चौकापर्यंत पॅक स्वरूपाच्या उड्डाणपूलाची निर्मिती Pack flyover होणार आहे. यासाठी हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहे. असे असताना मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी याला तिव्र विरोध दर्शविला असून रोषयुक्त असंतोष पहायला मिळत आहे. "उड्डाणपूलाला आमचा विरोध नाही, फक्त शहरातून पॅक नसावा" अशी भावना व्यापाऱ्यांची आहे.


सदर उड्डाणपूल पॅक ऐवजी पिल्लरचा आतून खुला बनवण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे. पॅक पूलाच्या निर्णय शासनाने मागे घ्यावा यासाठी शहरातील नागरिक, समस्त व्यापारी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी 5 मे रोजी बसस्थानक परिसरातील "संविधान चौक" येथे काळी फिती लावून निषेध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले.


पॅक स्वरूपाच्या या उड्डाणपूलाची निर्मिती झाली तर व्यापाराची वाट लागेल, शहर 2 भागात विभागले जाणार, ज्याज्या ठिकाणी अशा उड्डाणपूलांची निर्मिती झाली त्यातील कित्येक ठिकाणचे व्यापारी देशोधडीला लागल्याचे चित्र असून आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. अगोदरच कोरोनाने कंबरडे मोडले, आता कशीबशी गाडी रुळावर येताना पॅक उड्डाणपूलाचे संकट घोंगावत आहे, व्यापाऱ्यांनी मरावे की जगावे? समजणे कठीण झाले आहे, यामूळे शहरातील बेरोजगारीवर भर पडेल, यात तिळमात्र ही शंका नाही,अशी जळजळीत प्रतिक्रिया उमटत आहे.

उड्डाणपूल व्यापाऱ्यांच्या जीवावर उठला असून पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. लवकरात लवकर शासनाने पॅक पुलाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा यापुढे आंदोलनाची मालिका सुरूच राहील असा इशारा देण्यात आला असून आजचे आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने अंदाजे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. यासंदर्भात शासनाला निवेदन पाठवण्यात आले. आता मात्र मायबाप सरकार Maibap Govt व्यापाऱ्यांच्या व्यथेवर सकारात्मक विचार करून खुल्या पुलाची निर्मिती करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने