कोरपना:- कोरपना तालुक्याचे आर्थिक, औद्योगिक व्यापारी केंद्र व सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर येथे सुसज्ज बस स्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा पाऊस झेलत रस्त्यावरूनच बस पकडावी लागते आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील राजुरा आगारा अंतर्गत गडचांदूर येतात. राजुरा नंतर सर्वाधिक वर्दळीचे बस थाबे म्हणून गडचांदूर गणले जाते. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात महसुल ही एसटी ला प्रवाशाच्या माध्यमातून प्राप्त होतो. मात्र गडचांदूर येथे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही सर्व सोयींयुक्त बस स्थानकाची निर्मिती होऊ शकली नाही. परिणामी रस्त्यावरच तासंतास उभे राहून प्रवाशांना आपली बस पकडावी लागते आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे प्रमुख बाजारपेठ व व्यस्त ठिकाण असल्याने या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक व्हावे. यासाठी नागरिकांची मागणी आहे. मात्र त्यावर अजून पर्यंत वेगवान पावले कधीच उचलण्यात आली नाही. त्यामुळे अत्यंत कासवगतीने जागा शोध, कार्य व इतर प्रक्रिया सुरू असताना दिसते. बस स्थानक नसल्याने नागरिकांना रस्त्यावरील हॉटेल व पान टपरीचा आधार घेऊन उभे राहावे लागते. यात लहान मुले, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध मंडळी यांना गैरसोय निर्माण होते आहे. ऊन, वारा, पाऊस असल्यास ही स्थिती अधिकच गंभीर होते आहे. सद्यस्थितीत असलेल्या बस स्थानक स्थळी बसचे वेळापत्रक लावले नाही. त्यामुळे बसेस बाबत निश्चित माहिती प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे परिणामी नागरिकांची मोठी तारांबळ उडताना दिसते. या मागणीकडे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.