अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा घेतला निर्णय
मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे. लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
याविषयी बोलताना शरद पवार यांनी मी” राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचेही ते म्हणाले.
संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावुक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.