Top News

गोंडपिपरी तालुक्यातील मोबाईल शॉपी, हार्डवेअर प्रतिष्ठाने दुकाने उघडण्यावरून नगर प्रशासन आणि व्यापारी आमने-सामने

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून नियम शिथिल :- स्पष्ट व लेखी आदेश नसल्याने नगर पंचायतीचा नकार
Bhairav Diwase.   April 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- संपूर्ण विश्वात कोरोना या महामारी संकटाने थैमान घातले असून याचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. देशपातळीवरील या निर्णयामुळे मोठी शहरापासून तर गाव खेड्यापर्यंत पूर्णता व्यवसाय प्रतिष्ठाने बंद आहेत. मात्र ग्राम स्तरावरील अर्थव्यवस्थेचा विचार घेत काल जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन नियमांमध्ये शिथिलता आणून अत्यावश्यक सेवांसह मोबाईल रिचार्ज शॉपी व बांधकाम साहित्य पुरवणारी हार्डवेअर ची दुकाने उघडण्या संबंधिची माहिती सोशल मीडिया तथा प्रसारमाध्यमांना दिली. ही माहिती सर्वत्र पोहोचताच आज सकाळपासूनच शहरातील मोबाईल शॉपी व हार्डवेअर व्यवसाय चालकांनी आपापली प्रतिष्ठाने उघडण्यास सुरुवात केली. यावर आक्षेप नोंदवत नगरपंचायतीने उघडलेली दुकाने बंद करा अन्यथा कारवाई करू असे सूतोवाच केल्याने नगर प्रशासन व नागरिक आमने सामने आल्याचे दिसून आले. तसेच कृषी केंद्र व्यवसाय आड काही व्यापाऱ्यांकडून हार्डवेअर दुकानातील बांधकाम साहित्य विक्री केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये ओरड सुरू झाली होती.
राज्य सीमेवर बसलेला चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखले जातो. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चा एकही रुग्ण नसल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून जीवनावश्यक वस्तूंसह, इतर व्यवसाय प्रतिष्ठाने टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचे ठरवीत काल सोशल मीडिया तथा प्रसारमाध्यमांना मोबाईल रिचार्ज व हार्डवेअरची दुकाने सुरू ठेवण्यास संबंधीची माहिती दिली. यावरून शहरातील नागरिकांनी आज सकाळपासूनच आपली व्यवसाय प्रतिष्ठाने उघडण्यास सुरुवात केली मात्र नगरपंचायतीने यावर आक्षेप नोंदवत पथकाद्वारे उघडलेली सर्व दुकाने बंद करण्यास सुरू केले. तर व्यवसाय प्रतिष्ठाने बंद करणाऱ्या पथक व व्यवसायदार यांच्यात शासनाच्या आदेशावरून काही काळासाठी मतभेद निर्माण होऊन संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांच्याशी वार्तालाप केला असता नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी सांगितले की, जिल्हास्तरावरून जिल्हा प्रशासनाने जरी सोशल मीडिया कथा प्रसारमाध्यमांना मोबाईल शॉपी व हार्डवेअर व्यवसाय प्रतिष्ठाने सुरू करण्यासंबंधीची माहिती दिली असली तरी मात्र आमच्याकडे असे कुठलेही लेखी आदेश आले नसल्याने तसेच सदर व्यवसाय प्रतिष्ठाने नेमके कुठल्या दिवशी व कुठल्या वेळेत सुरू ठेवायचे या संबंधित चे आदेश अद्यापही अप्राप्त असल्याने नगर प्रशासनाकडून सदर व्यवसाय सुरू ठेवण्यास वरिष्ठ स्तरावरून पुढील आदेश प्राप्ती पर्यंत बंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी नगर प्रशासनाच्या या कारवाई संबंधी गैरसमज न बाळगता जिल्हा प्रशासनाचे लेखी आदेश प्राप्त होताच संबंधित व्यापाऱ्यांना मुनारी अथवा लेखी आदेशाद्वारे व्यवसाय प्रतिष्ठाने सुरू करण्यासंबंधी सूचना पुरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने