आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय सीमेवर कडेकोड सुरक्षित ठेवण्यात आल्या.
Bhairav Diwase. April 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना शिरकाव करू शकलेला नाही. याचं कारण म्हणजे जिल्ह्याच्या सीमा लगेच सील करण्यात आल्या. केवळ सीलच नाही तर तिथं चोवीस तास पहारा दिला जात आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय सीमा कडेकोड सुरक्षित ठेवण्यात आल्या. तेलंगणाचा मोठा प्रदेश या जिल्ह्याला लागून आहे. तिथं रोटी-बेटी व्यवहारही चालतात. हे लक्षात घेऊनच प्रशासनानं तगडा बंदोबस्त सीमावर्ती भागात लावलाय.
जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसणं, ही आनंदाची बाब असली, तरी याला दृष्ट लागू नये म्हणून मोठी खबरदारी घेतली जात आहे. जिवती तालुक्यातील पाटण हे असंच एक गाव. या गावालगत तेलंगणाची सीमा आहे. आता धोका केवळ बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळंच होऊ शकतो, हे लक्षात आल्यानं पाटण इथून तेलंगणात जाणारा कच्चा मार्ग जेसीबीच्या साह्यानं फोडण्यात आला.
याच मार्गावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनं ये-जा करायची. याची माहिती मिळताच पोलीस विभागानं हा मार्ग फोडून टाकला आणि तिथं चौकी निर्माण केली.
पायीसुद्धा कुणी ये-जा करू नये, यासाठी हा बंदोबस्त करण्यात आला. शिवाय परराज्यातून किंवा जिल्ह्यातून एखादी अनोळखी व्यक्ती गावात येत असेल, तर त्याची लागलीच माहिती द्यावी, असे निर्देश प्रशासनानं स्थानिक पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना दिलेत. सध्या चंद्रपूर जिल्हा सुरक्षित असला तरी पुढे कोणतं संकट येऊ नये, यासाठी शक्य तेवढी ताकद प्रशासन इथं पणाला लावत आहे.