Top News

मान्सूनच्या आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा:- जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर व पावसाळ्यामध्ये सर्व नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोचविण्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी:- जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार
Bhairav Diwase.    May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- मान्सूनच्या आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा व यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना दिले. जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक दिनांक 18 मे रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
      पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाट बंधारे विभागाने विशेष काळजी घ्यावी. तसेच पुलांची सुरक्षा मान्सून पूर्व काळातच तपासून घ्यावी. याविषयीची सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.
     दरम्यान, गोसेखुर्द, इरई इत्यादी धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठा असतो. परंतु, पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी पाणीसाठ्याची व पुरा संबंधित पूर्वसूचना केंद्रीय जल आयोगाने तसेच पाटबंधारे विभागांनी संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका नगरपंचायती, नगरपरिषद यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मान्सून पूर्व नालेसफाई व इतर मान्सून पूर्व कामे पूर्ण करावी व कुठेही पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने कोणत्याही जनावरांना रोग पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी व तसे प्रयत्न करावे त्याचप्रमाणे जिल्ह्यात आजारा संबंधित प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य यंत्रणेने राबवावी व औषधांचा साठा कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच पावसाळ्यामध्ये झाडे पडून रस्ते अपघात होण्याची दाट शक्यता असते हे लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर व पावसाळ्यामध्ये सर्व नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोचविण्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संबंधितांना दिल्यात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने