चंद्रपूर जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही : डॉ. कुणाल खेमनार

मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
    Bhairav Diwase.    May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- करोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये मिठाचा तुटवडा असल्याची अफवा पसरली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा मिठाचा तुटवडा नाही. मोठ्या प्रमाणात मिठ साठा उपलब्ध आहे,अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे. सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मीठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.


नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत किंवा जास्तीचे पैसे देऊन मीठ खरेदी करू नये.अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी मीठ जास्तीची खरेदी केल्यास जिल्हयात मीठ संपण्याच्या अडचणीस सामोरे जावे लागेल. मात्र जिल्ह्यात मीठाचा मुबलक साठा असून अकारण मीठ खरेदी करून साठा करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. दुकानदार यांनीही याबाबत आवश्यक काळजी घेऊन ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेऊन मीठ विक्री करू नये.

तसेच याबाबत येणाऱ्या ग्राहकांना ही खरी माहिती द्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.अचानक वाढलेली मागणी व बाजारपेठेतील मिठाची झालेली कृत्रिम टंचाई याबाबत प्रशासनाने दखल घेऊन नागरिकांना आवाहन केले आहे. प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. कोणतीही अफवा असल्याचे लक्षात आल्यास ताबडतोब प्रशासनाला कळवा आणि त्याबाबत खात्री करून घ्या. चंद्रपुर जिल्हयात उपविभाग निहाय विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात आलेले असुन त्यांचे मार्फत जीवनावश्यक वस्तु विक्रेत्याची तपासणी करण्यात येत असुन लॉकडाऊनचे काळात आजपर्यंत या पथकांनी ४४६ तपासण्या केल्या असुन १३ दुकानांविरुध्द कारवाई प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या