Top News

अधिकाऱ्याने केला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर मुलीचा विवाह.

गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील लग्न समारंभ साध्या पद्धतीने पार.
Bhairav Diwase.   May 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- नात्यातील माणसांच्या गोतावळ्यात सर्वांच्या आशीर्वादाने होणाऱ्या लग्नसोहळ्यांचे समीकरण कोरोना काळामुळे बदलले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहसोहळा हा नेहमीसाठी स्मरणात राहणारा असावा, अशी इच्छा असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता, शासकीय नियम व अटींची पूर्तता येथील एका विवाह समारंभात करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील लोंढोली येथील रहिवासी गडचिरोलीच्या आरमोरी पंचायत समितीचेे संवर्ग विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांची कन्या शीतल हिचे लग्न चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथील रहिवासी व सरकारी नोकरीवर असलेल्या मुलाशी 4 महिन्यापूर्वीच जुळले होते. देशात लॉकडाउन व संचारबंदी लागण्यापूर्वीच वधू व वरपक्षांकडील लोकांनीं 18 मे ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. लग्न पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. मात्र अचानक कोरोनाचा लॉकडाउन, संचारबंदी वाढतच गेल्याने विवाह रखडत गेला. कोरोना बंदीमुळे आरमोरी येथील सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी यांना आपल्या कुटुंबासाहित आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गावी जाता आले नाही. लॉकडाऊन 4 मध्ये अखेर विवाह सोहळ्यांना मंजुरी मिळाली. कोमलवार यांनी शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून आरमोरीपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील हा लग्न समारंभ साध्या पद्धतीने पार पाडला. सामाजिक अंतर ठेवून नवदाम्पत्यासह इतरांनी मास्क वापरून उपस्थिती दर्शविली. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावर मधूबन फॉर्म हाऊस व रेस्टॉरंट असून या ठिकाणी आरमोरी तालुका आरोग्य विभागाचे तपासणी पथक आहेत. याच ठिकाणी वधू व वरपक्षाकडील लग्नासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. नंतरच त्यांनी लग्न स्थळी प्रवेश घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला 50 सर्जीकल हँड ग्लोवज, 200 डिसपोजल हँडग्लोज, 1000 मास्क, सॅनिटायजरच्या 5 लिटरच्या बाटल्या आदी साहित्यासह आरोग्य किटची मदत विवाहाच्या निमित्ताने करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने