Top News

गोंडपिपरी तालुक्यातील अकार्यक्षम ठाणेदार धोबे यांना तत्काळ निलंबित करून हटविण्याची मागणी, गोंडपिपरी तालुका भाजपाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांचेकडे दिले निवेदन.

🔴अनेक गुन्ह्यांमध्ये अपयश, भाजपा चा आरोप.
   Bhairav Diwase.   May 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात येथे कार्यरत असलेले  प्रभारी ठाणेदार संदीप धोबे यांच्या कार्यकाळात आजवर घडलेल्या गुन्ह्यांमध्ये हे सपेशल अपयशी ठरले आहे. यामुळे येथेच कार्यरत काही पोलीस शिपायांनी गोरगरीब व सामान्य जनतेला वेठीस धरून वसुलीचा सपाटा सुरू केला आहे. अश्या अपयशी ठाणेदार व लुटारू वृत्तीच्या पोलीस शिपायांना ताबडतोब निलंबित करून उचल बांगडी करावी. व जनतेला न्याय द्यावा अशी मागणी गोडपिपरी तालुका भाजपा चे वतीने पोलीस अधीक्षक यांचेकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा विकासापासून कोसो दूर असून सदर तालुक्याला तेलंगाना राज्य सीमा लागून असल्याने जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही गोंडपीपरि तालुक्यात अवैध दारू तस्करी, अवैध वाळू वाहतूक, दारू विक्री, गोवंश तस्करी, सुगंधित तंबाखूची विक्री असे अनेक अवैध धंदे अगदी राजरोसपणे केल्या जाते. अश्यातच  येथे काही वर्षांपूर्वी कार्यरत   तत्कालीन ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर लगाम लावण्यात पूर्णपणे यश प्राप्त केले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी ठाणेदार म्हणून रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धोबे यांना मात्र तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर लगाम लावण्यात सपेशल अपयश आल्याचे दिसून येते. यात गोवंश तस्करी, वाळू तस्करी आदी प्रकरण सह नुकत्याच पार पडलेल्या काही कारवायांमध्ये ते वादग्रस्त ठरले आहे. अश्या वादग्रस्त ठाणेदार व लुटारू पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी तालुका भाजपा ने कंबर कसली असून पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनानुसार  गेल्या काही दिवसांपूर्वी गोंडपिपरीं येथे अवैध तांदूळ साठा पकडण्यात आला. मात्र या प्रकरणात ठाणेदार धोबे यांनी आरोपींना अटक न करता पाठीशी घातले आहे. तसेच काही दिवसा अगोदर गणेशपिपरी जवळ अवैध दारुसह कलीम सय्यद याला रंगेहाथ पकडले मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार याला पकडण्यात अपयश आले. तसेच येणाऱ्या खरीप हंगाम पाहून अनेक वर्षांपासून फोपवलेल्या चोर बी टी ( कापसाचे बोगस बियाणे ) व्यवसायिकांनी यंदाही चोर बीटी बियाण्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा चालविला. मात्र ठाणेदार धोबे यांनी मुख्य चोर बीटी विक्रेत्यांवर कारवाई न करता शेतकऱ्यांवर सूड उगवण्याचे धोरण अवलंबले आहे. तर अनेक प्रकरणांमध्ये चोर बी टी विक्री करणाऱ्या एजंटांना "अर्थ ' कारणामुळे  कारवाईतून मुभा दिली आहे.तद्वतच गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामीण रुग्णालय समोर दारू नेणारे वाहन पकडले.मात्र त्यात कारवाई न करता पोलीस शिपाई देवेश कटरे, संतोष काकडे, प्रफुल कांबळे, यांनी संबंधित दारू तस्करांकडून लाखो रुपये घेऊन वाहन सोडून देत पकडलेली दारू परस्पर विकली. तसेच दि.23 मे रोजी रात्री चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून तालुक्यातील नंदवर्धन - अडेगावं मार्गावर  २.५ लाखाची अवैध दारू पकडली मात्र हीच कारवाई गोंडपिपारी ठाणेदार धोबे यांना का करता आली नाही. अशा अनेक कारवायांमध्ये सपेशल अपयशी ठरलेले गोंडपिपरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धोबे हे वादग्रस्त ठरत असून यांची तसेच पोलिसी खकीचा दुरूपयोग करून जनसामान्यांना वेठीस धरून वसुलीचा सपाटा लावणाऱ्या पोलीस शिपाई देवेश कटरे, संतोष काकडे, व प्रफुल कांबळे यांना निलंबित करून तत्काळ नवीन ठाणेदार देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुकध्यक्ष बबन निकोडे यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने