भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा, 3 जणांचा जागीच मृत्यू.

Bhairav Diwase
चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघात.
Bhairav Diwase.   June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील अपघातांची मालिका थांबत नसल्याचं दिसत आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागपूर वरून चंद्रपूरकडे इर्टिगा गाडीतून काही जण प्रवास करत होते. मात्र गाडी अतिशय वेगात असल्याने चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली इथं या गाडीचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी तब्बल 100 फूट घासत पुढे निघून गेली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर या अपघाताबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.

अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ:-
लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असल्याने रस्ते अपघातांचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली गेली आणि रस्त्यांवरून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहने धावू लागली. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांनाही वेगावर मर्यादा ठेवून इच्छित स्थळ गाठवं लागणार आहे.