सावली नगरातील समस्या त्वरित सोडवा:- वंचित बहुजन आघाडी ची मागणी.

सावलीचे तहसीलदार पुष्पलता कुंभरे यांना विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी शाखा सावली च्या वतीने सादर.
Bhairav Diwase.   June 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:-  सावली शहरातील समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात या संदर्भात सावलीचे तहसीलदार पुष्पलता कुंभरे यांना विविध मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी शाखा सावली च्या वतीने सादर करण्यात आले.
 सावली नगर पंचायतीची स्थापना होऊन जवळपास पाच वर्षाचा कालावधी लोटत असला तरी सावली शहर विकासापासून कोसो दूर आहे. यामध्ये सावली शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या असून महिना भरात फक्त पंधरा दिवस नळाला पाणी येते तर पंधरा दिवस बंद अवस्थेत असतात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सावली नगरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होत आहे. सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचा उपसा न झाल्याने पाणी साचून डासाचा त्रासामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे.  वंचित बहुजन आघाडी तर्फे अग्निशमन दलाची मागणी मागील वर्षी करण्यात आली परंतु अजूनही या मागणीची पूर्तता करण्यात आली नाही.  शहरातून मुख्य मार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी मुख्य मार्गाचे काम न झाल्यास अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.  मुख्य मार्गावर पाणी टाकत नसल्याने शहरात धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांचा मनमानी कारभार सुरू असून त्याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रभार नवीन वैद्यकीय अधिकार्‍याकडे देण्यात यावा अशा अनेक मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देऊन संबंधित विभागाला सूचना करून समस्या त्वरित निकाली काढाव्यात अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडी शाखा सावली च्या वतीने देण्यात आला.
 यावेळी जिल्हा सल्लागार जे. जे. नगारे, तालुका अध्यक्ष चेतन रामटेके, तालुका महिला अध्यक्ष उल्काताई गेडाम, तालुका महिला महासचिव वेणूताई बोरकर, ज्येष्ठ कार्यकर्ता सुरेश सोमकुवर, जेष्ठ कार्यकर्त्या मायावती दमके, शहर अध्यक्ष रोशन बोरकर, मदन मेश्राम, विना गडकरी, भावना मानकर, उज्वला गोवर्धन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने