रात्री वीज गेल्याने गर्मीमुळे ठेवला घराचा दरवाजा उघडा, दरम्यान बिबट्याने केला प्रवेश अन्‌....

सुनंदा दादाजी वसाके (वय 57) असे जखमी महिलेचे नाव.
Bhairav Diwase.   June 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
ब्रह्मपुरी:- घरात झोपून असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना तालुक्‍यातील चिचगाव येथे रविवारी (ता. 28) उघडकीस आली. सुनंदा दादाजी वसाके (वय 57) असे जखमी महिलेचे नाव आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उत्तर वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र चिचखेडा हद्दीतील चिचगाव येथील सुनंदा दादाजी वसाके ही महिला शनिवारी, 27 जून रोजी रात्री कुटुंबीयांसह घरात झोपली होती. रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाला. उकाड्याने सर्वजण त्रस्त झाले. त्यामुळे बाहेरील मोकळी हवा घरात यावी या उद्देशाने घराचा दरवाजा उघडा ठेवून सर्व झोपी गेले.

मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या गावात शिरला. सुनंदा वसाके यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने त्याने सहज घरात प्रवेश केला. सुनंदा वसाके समोरच झोपल्या असल्याने बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला.

रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. महिलेला ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तातडीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीला हलविण्यात आले. पावसाचे दिवस असल्याने जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे कुणीही अंगणात किंवा दरवाजा उघडा ठेवून झोपू नये, असे आवाहन ब्राह्मणे यांनी केले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने