एका आठवड्यात हा दुसरा बळी आहे. गेल्या 3 महिण्यात वाघाच्या हल्ल्यात या भागातला हा 5 वा बळी.
Bhairav Diwase. June 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
चिमुर:- चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्लाच्या घटनेत वाढ झाली आहे. आज पुन्हा एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. एका आठवड्यात दुसरा तर गेल्या 3 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात या भागातला हा 5 वा बळी आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. राजू दडमल असं 47 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी दोन दिवसांपूर्वी शेतात गेला होता आणि तेव्हा पासून बेपत्ता होता. आज सकाळी कोलारा भागातील जंगलात या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली.
धक्कादायक म्हणजे, एका आठवड्यात हा दुसरा बळी आहे. गेल्या 3 महिण्यात वाघाच्या हल्ल्यात या भागातला हा 5 वा बळी आहे. ज्या भागात वाघाच्या हल्ल्या च्या या सर्व घटना घडल्या आहे तो भाग ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ आहे.
या भागात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, शेती आणि इतर कामांसाठी गावकरी या भागात जातात आणि जंगली जनावरांच्या हल्ल्यात बळी पडतात. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असली तरी या वाघाचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा प्रश्न वन विभागासमोर निर्माण झाला आहे.
वाघाच्या हल्ल्याचा घटनाक्रम
15 फेब्रुवारी - चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. बालाजी वाघमारे (वय 70) असं हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी कोलारा गावातील रहिवासी आहे. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी टेकाडी - मांडवझरी रोडवर असलेल्या शेतात गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत न आल्याने करण्यात आली शोधाशोध, त्यानंतर शेतातच मृतदेह आढळून आला.
8 एप्रिल - वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. चिमूर तालुक्यातील सातारा गावाजवळ ही घटना घटली. यमुनाबाई गायकवाड (57) असं मृतक महिलेचं नाव असून पहाटे मोहफुल वेचण्यासाठी ही महिला जंगलात गेली होती. मोहफुल वेचताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
19 मे - चिमूर तालुक्यातील कोलारा येथे वाघाने एका महिलेवर हल्ला केला होता. लीलाबाई चंद्रभान जीवतोडे (63) या महिलेचा हल्ल्यात मृत्यू झाला. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता वाघाने हल्ला केला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
4 जून - जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील बामनगाव शिवारातील वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. स्वतःच्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. राज्यपाल नागोसे ( वय 30) असं शेतकऱ्याचे नाव आहे.
7 जून - राजू दडमल असं 47 वर्षीय शेतकरी दोन दिवसांपूर्वी शेतात गेला होता. त्यानंतर आज पहाटे या शेतकऱ्याचा मृतदेह कोलारा भागातील जंगलात आढळून आला.