Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्हा आज 9 कोरोना बाधित.

Bhairav Diwase
बाधितांची संख्या ३३३ वर.
Bhairav Diwase. July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात कालपर्यंत ३२४ बाधितांची संख्या होती. आज त्यामध्ये दुपारी तीन पर्यंत ९ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३३३ झाली आहे. यापैकी २०२ बाधितांना उपचाराअंती कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या जिल्ह्यात १३१ बाधितांवर उपचार सुरू आहे.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये मूल येथील वार्ड नंबर १४ मधील ताडाळा रोड येथील ४८ वर्षीय व्यावसायिक संपर्कातून बाधित झाल्याचे पुढे आले आहे. येथील राईस मिल कामगारांच्या संपर्कात हे व्यवसायिक आल्याची नोंद आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे काम करणाऱ्या सावली तालुक्यातील लोंधळी येथील २७ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. कारंजा लाड येथून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात हा युवक होता.

मूल तालुक्यातील नांदगाव येथे कार्यरत असणारे मात्र चंद्रपूर शहरांमध्ये चोर खिडकी परिसरात राहणारे ५६ वर्षीय गृहस्थ श्रसनासंदर्भातील व्याधीने आजारी होते. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेतला असता. ते पॉझिटिव आले आहे.

भद्रावती येथील जैन मंदिर परिसरात राज्य राखीव पोलीस दलातील विलगीकरणात असणाऱ्या पोलीस जवानांपैकी चार पोलीस जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस लाईन येथे राज्य राखीव दलाच्या पोलीस जवानांना झालेली लागण लक्षात घेऊन काही जवानांना भ्रदावती येथे अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यापैकी चाचणी घेतलेल्यामध्ये चार जण पुन्हा पॉझिटिव्ह निघाले आहेत. आतापर्यंत राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .

याशिवाय भद्रावती शहरातील यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या नागरिकाचा कुचना येथील १५ वर्षीय मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. या पंधरा वर्षीय मुलाला संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात आले होते.

चंद्रपूर शहरातील दांडिया मैदानाजवळ राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. श्वसना संदर्भात आजारी असल्याने त्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज त्या पॉझिटिव्ह म्हणून पुढे आल्या आहेत.

यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पहिल्या ४५ दिवसांमध्ये ५० बाधित पुढे आले होते. त्यानंतर १६ दिवसात १०० बाधित झाले.त्यानंतर फक्त आठ दिवसात १५० बाधित झाले. २०० आणि २५० बाधित केवळ चार दिवसांच्या अंतराने झाले. तर बाधितांचा ३०० वर आकडा केवळ ३ दिवसात पोहोचला. जिल्ह्यात आतापर्यंत एकही मृत्यू कोरोनामुळे झाला नाही. मात्र संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, मास्क वापरणे अनिवार्य ठेवावे, शारीरिक अंतर राखावे,काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.