दारुडा बाप रोज करीत होता घरी शिवीगाळ; मुलाचे डोके भडकले आणि....

Bhairav Diwase
श्रावण चौधरी (वय 45) असे मृत वडिलांचे, तर नागेश चौधरी (वय 25) असे मुलाचे नाव.
Bhairav Diwase.    July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- लॉकडाउनच्या काळात घरी आलेल्या मुलाने आई आणि बहिणीला दारुड्या बापाकडून वारंवार होणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील चोरगाव येथे सोमवारी, 6 जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण चौधरी (वय 45) असे मृत वडिलांचे, तर नागेश चौधरी (वय 25) असे मुलाचे नाव आहे.

चोरगाव येथे चौधरी कुटुंबीय राहते. श्रावण चौधरी हे शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलगा नागेश हा चेन्नईत आणि मुलगी नागपूर येथे खासगी कंपनीत कामावर होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दोघेही बहीणभाऊ घरी आले होते. वडील श्रावण चौधरी हे दररोज दारू पिऊन घरी यायचे. त्यानंतर पत्नी आणि मुलांना शिवीगाळ करायचे. हा प्रकार नेहमीचाच झाला होता.

श्रावण चौधरी यांच्या वागण्यामुळे सर्व कुटुंबीय कंटाळले होते. सोमवारी, 6 जुलै रोजी सकाळी याच कारणातून घरी वाद झाला. रागाच्या भरात मुलगा नागेशने वडील श्रावण यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. नागेशला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.