Top News

भिसी ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच व विस्तार अधिकारी ए. सी.बी.च्या जाळयात.

तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना केली रंगेहात अटक.
Bhairav Diwase.    July 22, 2020



(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- ई-निविदा प्रक्रियेतील चौकशीतून नाव वगळण्यासाठी 30 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या चिमूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, भिसी ग्राम पंचायतचे सरपंच व उपसरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवार, 22 जुलै रोजी केली. या कारवाईने पंचायत समिती व ग्राम पंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
विस्तार अधिकारी हेमंत हुमणे, सरपंच योगिता गोहणे, उपसरपंच लिलाधर बन्सोड असे लाचखोरांचे नाव आहे. भिसी ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत असताना ग्राम पंचायत अंतर्गत कामांची ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही पक्रिया यथायोग्य राबविण्यात न आल्याचा ठपका ठेवून तत्कालिन ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाची चिमूर पंचायत समितीच्या पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी हेमंत हुमणे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.
 
या चौकशीतून तक्रारदाराचे नाव काढण्याकरिता विस्तार अधिकार्‍याने 30 हजार रूपयाची मागणी केली. आरोपी हुमणे यांना लाच देण्यासाठी भिसी ग्राम पंचायतचे सरपंच व उपसरपंच यांनीही अपप्रेरणा दिली. मात्र, तक्रारदार ग्रामसेवकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.
 
बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून विस्तार अधिकारी, सरपंच व उपसरपंच यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूद्ध चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधिक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधिक्षक अविनाश भामरे, पोलिस निरिक्षक निलेश सुरडकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, अरूण हटवार, संदेश वाघमारे, नरेश नन्नावरे यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने