स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी रहाण्यासाठी आमदार बंटी भांगडिया यांचे आवाहन.
Bhairav Diwase. July 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- कोरोणासारख्या जागतिक महामारीच्या संकटात संपूर्ण देशभर टाळेबंदी घोषित आहे. त्यामुळे मागिल काही महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे अवाढव्य वीज बिलाची मागणी केली आहे. त्यामुळे हे वीज बिल संपूर्णतः माफ करण्यात यावे. आणि एप्रिल २०२० पासून केलेली विजेची दरवाढ मागे घेण्यात यावी.
चंद्रपूर जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत चौदा हजारापेक्षा जास्त लाभार्थी आहेत. या योजनेचा निधी लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे सदर नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे तो निधी सुध्दा तातडीने देण्यात यावा.
तसेच विद्यमान शासनाने कर्जमाफी जाहीर केली, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे, शिवाय अनेक शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन सुध्दा झालेले नाही. त्यामुळे हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिकदृष्टया हवालदिल झालेला आहे. या आर्थीक संकटातुन शेतकऱ्याला बाहेर काढण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना युरीया व संबंधित खते तातडीने उपलब्ध करून द्यावे.
टाळेबंदीत अनेकांचा रोजगार गेला, हातावर पोट घेवून जगणार्यांसमोर उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यामुळे बारा बलुतेदार व गोरगरीबांना राज्य सरकारतर्फे पॅकेज देण्यात यावे.
अशा सबंध समस्यांकडे निद्रीस्त असलेल्या शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हाच्या वतीने जिल्ह्यात सर्व ठिकाणी महाविकासआघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.
करिता, भारतीय जनता पार्टी चिमुर विधानसभा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचित करण्यात येते की, उद्या दि. १७ जुलै रोज शुक्रवारला दुपारी १२:०० वाजता आपणही आपआपल्या गावामध्ये आघाडी सरकारच्या निषेधार्थ असे आंदोलन करून पक्षाच्या आव्हानाला प्रतिसाद द्यावे.