Top News

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच न्यायालयात करणार याचिका दाखल.

राज्य सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मुदतवाढ देण्यात यावी:- सरपंच ग्रामपंचायत
Bhairav Diwase.    July 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे निकष राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार सध्याच्या कार्यरत असलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांमधून प्रशासक नियुक्त केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावातील योग्य व्यक्तीच प्रशासकपदी येणार आहे.


वरील विषयाच्या अनुषंगाने नुकताच अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील 27 हजार 882 ग्राम पंचायतीपैकी या वर्षभरात 14, 314 ग्राम पंचायतींच्या निवडणूका होणे अपेक्षित आहे. मात्र या ग्राम पंचायतीवर प्रशासक बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ज्या पध्दतीने मार्च 2020 च्या विधीमंडळ अधिवेशनात सहकारी संस्था, मध्यवर्ती बँकांच्या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली त्याच पध्दतीने या ग्राम पंचायतीवरील सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. मात्र राज्य शासनाने लोकशाही मुल्यांना दूर सारत हा निर्णय घेतला आहे. 

वास्तविक बघता आज या बाद होत असलेल्या ग्राम पंचायतीमध्ये कोणत्या विचारांचे सरपंच आहे हे कोणालाही माहीत नाही, कारण ग्राम पंचायत निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर, विचारावर लढली जात नाही. ग्रामीण भागातील जनता आपल्या गावातील प्रश्न सोडविण्यासाठी ग्राम पंचायत निवडणूकीत सहभागी होतात व सरपंच, उपसरपंच व सदस्यांना निवडून देतात.

    राज्य सरकारने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणे या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात पोंभुर्णा तालुक्यातील सरपंच न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. आज घेतलेल्या सरपंचाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून. लवकरच तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा काही काळासाठी त्याच सरपंचांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने