Top News

शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करावे, कृषी विभागाचे आवाहन

कृषी विभागाचा हवामान आधारीत कृषि सल्ला
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी भात पिकाच्या रोवणीला सुरूवात करावी. तसेच धान पीक रोपवाटीकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण, कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठ्यास एक किलो युरीया दयावा. पावसाचा अंदाज बघून पिकावर किटकनाशकाची, बुरशीनाशकाची, तणनाशकाची फवारणी करावी. शेतकऱ्यांनी स्थानिक वातावरणाचा अंदाज घेवून शेती कामाचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हवामान आधारित कृषी सल्ला पुढील प्रमाणे आहे.धान रोपवाटीका ते पुर्नलागवडी संदर्भात पुढील पाच दिवसात जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार धान पीक रोपवाटीकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण, कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठ्यास एक किलो युरिया दयावा. पुढील हवामान अंदाजावरून धान पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळण्याची शक्यता आहे.तरी त्याच्या व्यवस्थापनासाठी कार्बनडान्झीम 50 टक्के डब्लूपी 10 ग्राम किंवा म्यान्कॉझेब 75 टक्के प्रवाही यापैकी कोणत्याही एका बुरशी नाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर 10 दिवसाच्या अंतराने दोन ते चार फवारण्या कराव्यात.

मागील तीन ते चार दिवसात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची भात रोपे 21 ते 25 दिवसांचे झाले असल्यास त्यांनी भात पिकात रोवणी करावी. त्यासाठी रोपे काढण्याच्या दोन दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढवावी, त्यामुळे मुळे न तुटता रोपे काढण्यास मदत होते. रोपांची लावणी 20 सें. मी. X 15 सें.मी. अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपे सरळ व उथळ म्हणजेच 2 ते 4 सें.मी खोलवर लावावीत.

पूर्वमशागत केलेल्या धानाच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करावी. चिखलणी नंतर शेत समपातळीत येण्यासाठी पाणी (फळी) फिरवावी. चिखलणी करतांना स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताची शिफारस केलेली पुर्ण मात्रा (50 किलो स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक खताचा शिफारस केलेली पूर्ण मात्रा (50 किलो स्फुरद म्हणजेच डीएपी 110 किलो + 50 किलो पालाश म्हणजेच एमओपी 85 किलो प्रति हेक्टरी) व नत्रयुक्त खताची निम्मी मात्रा (50 किलो नत्र म्हणजेच 66 किलो युरिया प्रति हेक्टरी) शेतात मिसळावी व शेतातील पाणी बांधून ठेवावे.

पेरीव धान पध्दत: पुर्व विदर्भात हात रोवणीस पर्याय म्हणून धानाचे अधिक उत्पादन व आर्थिक मिळकती करीता पेरीव पध्दतीने धान लागवड जुलै महिन्याच्या 15 तारखे पर्यंत करावी. त्याकरीता जाड धानाचे 75 किलो या बारीक धानाचे 50 किलो बियाणे प्रति हेक्टरी व 125:62.5:62.5 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी दयावे तसेच दोन ओळीत 20 से.मी. अंतर ठेवून पेरणी करावी.

तूर बीजप्रक्रिया ते पेरणी: धान बांधीतील धुऱ्यावर तूर पीक पेरणी पुर्ण करावी. त्याकरीता आयसीपीएल 87119 (आशा), सी 11 व पीकेव्ही तारा या वाणांची निवड करून हेक्टरी बियाणांचे 10 ते 15 किलो वापरून 60 X 30 सें. मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम जपोनिकम व पीएसबी प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी 2 ते 3 तास अगोदर लावून सावलीमध्ये वाळवावे. मर व मुळकुज रोग कमी करणेकरीता पेरणीच्या वेळी ट्रायकोडरमा 4-5 ग्रॅमची बीजप्रक्रिया करावी. उगवणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या दोन ते तीन वेळा डवरणी करावी व आवश्यकतकनुसार निंदणी करावी. उगवणीनंतर तणनाशक पायरीथिओबॅक सोडियम 62.5 ग्राम सक्रीय घटक, हेक्टर अधिक क्विझाल्फोपेथिल 50 ग्रॅम सक्रीय घटक मिसळून 20-30 दिवसानंतर तन 2-4 पानाच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.

सोयाबीन वाढीची अवस्था: शेतकऱ्यांनी स्थानिक वातावरणाचा, पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तणनाशकाची फवारणी करावी. पेरणी नंतर पहिली डवरणी 15 ते 20 दिवसांनी व दुसरी डवरणी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान करावी. आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा निंदणी करावी. सोयाबीनमध्ये उगवणीनंतर 10 दिवसांनी ईमाझीथायपर 75 ग्राम क्रियाशील घटक प्रती हेक्टर फवारणी करून पेरणीनंतर 25 दिवसांनी एक डवरणी करून प्रभावीपणे तण नियंत्रण करता येईल.

कोविड-19 या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला मास्क लावावे. शेतात काम करतांना लोकांमध्ये संपर्क टाळण्यासाठी 3 ते 5 फुट अंतर ठेवावे. समुदायामध्ये जवळजवळ एकत्र येऊ नका. हात वारंवार साबणाने धुवून सॅनिटायझर वापरावे. शिंकताना व खोकलतांना तोंडावर रूमाल धरावे व स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने