Murder News: मित्रच बनला वैरी! कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने संपवले आयुष्य; आरोपी अटकेत!

Bhairav Diwase

मुल:- आज चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. शुल्लक वादातून एका मित्राने आपल्याच नोकर मित्राची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.


ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील मारोडा गावात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारोडा येथील मुल रोडवर 'अमित चिकन सेंटर' नावाचे दुकान चालवणाऱ्या अमित अनिल निकेसरचा रेतीचाही व्यवसाय आहे. त्याच्याकडे १९ वर्षीय शंतनू मुरलीधर येरणे हा रेती व्यवसायाची वसुली करत होता.

सध्या घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप सुरू असल्याने, त्या संदर्भात शंतनू हिशोब देण्यासाठी अमितकडे गेला होता. याच हिशोबावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात अमित निकेसरने आपल्या चिकन सेंटरमधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने शंतनूच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात शंतनू जागीच कोसळला.

आरोपी अमित निकेसरने स्वतः मुल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली. शंतनूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. मुल पोलीस स्टेशन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या घटनेने मारोडा परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपासातूनच या प्रकरणाची अधिक माहिती समोर येईल.