Chandrapur News: दारुड्याला लोको पायलटचा 'धुलाई' प्रसाद!

Bhairav Diwase

चंद्रपूरमधील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर:- सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लोको पायलटची समयसूचकता आणि धाडस दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावरील राजोली रेल्वे फाटकावर ही थरारक घटना घडली आहे.


ही दृश्ये आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-सिंदेवाही मार्गावरील राजोली रेल्वे फाटकावरील. एक व्यक्ती दारूच्या नशेत चुर होऊन चक्क रेल्वे रुळावर लोळत पडला होता. समोरून येणारी रेल्वे त्याच्या दिशेने येत होती. जर लोको पायलटने प्रसंगावधान दाखवले नसते, तर एक मोठा अपघात घडला असता.

लोको पायलटला दूरूनच रुळावर काहीतरी असल्याचा संशय आला. त्याने तात्काळ रेल्वेचा वेग कमी केला आणि प्रसंगावधान राखत रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानंतर, लोको पायलट तात्काळ खाली उतरला. त्याने पाहिले की एक व्यक्ती दारूच्या नशेत रेल्वे रुळावर लोळत आहे.

या व्यक्तीच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या लोको पायलटने त्याला धू-धू धुतले. त्याला रुळावरून बाजूला केले. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या घटनेमुळे लोको पायलटच्या समयसूचकतेचे कौतुक होत असले तरी, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे रुळासारख्या धोकादायक ठिकाणी असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या बेजबाबदारपणाचा आणि त्यामुळे इतरांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

खरंच, लोको पायलटच्या या कृतीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. मात्र, अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे अत्यंत आवश्यक आहे.