रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!

Bhairav Diwase

भैरव धनराज दिवसे
मुख्य संपादक
आधार न्यूज नेटवर्क
8007101459, 9325856751

सण आजचा वर्षांचा....‌ भाऊ बहीनीच्या नात्यांचा
आहे रक्षाबंधनाचा…... नेत्रांच्या निरांजनाने,
औक्ष माझे लाभो तुला...… असा आनंद सोहळा, 
तुजवीण सुना सुना...… धागा नाही हा नुसता, 
विश्वास हा तुझ्या ..... माझ्यातला.

       नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही मंगल मनोकामना असते.

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी......
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच....
या तर हळव्या रेशीमगाठी…….


या दिवशी बहीण आपल्या भावास राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.

        हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.

घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ!  शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्‍या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई. आई-बाबाकडून मिळणारा 'प्रसाद' वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो.

शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा 'बॉडीगार्ड'च बनूनच जातो. तिच्या आवडी निवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो.

ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो.