जिल्ह्यात 60, तर चंद्रपुरात 9 रूग्ण.
खाजगीत डेंग्युने मृत्यू, तर प्रशासनाच्या लेखी निरंक.
Bhairav Diwase. Aug 02, 2020
चंद्रपूर:- कोरोना महामारीसोबतच आता वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’ने डोके वर काढले आहे. खाजगी रूग्णालयात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यूच्या रूग्णांत वाढ झाली असून, चंद्रपूर महानगरातील बाबुपेठ, नेहरू नगर, सरकार नगर, भानापेठ, नगिनाबाग, आंबेडकर वॉर्ड, अंचलेश्वर वॉर्ड परिसरात साथीच्या आजार पसरले आहे. बाबुपेठ येथील एका व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची नोंद खाजगी दवाखान्यात झाली आहे.
पण, प्रशासकीय दप्तरात तशी नोंद नाही. आतापर्यंत चंद्रपूर महानगर व ग्रामीण भगाात 60 डेंग्यूचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यात चंद्रपूर महानगरातील 9 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात मागील 20 दिवसांपासून तप्त उन्हाने कहर केला आहे. ऐन पावसाळ्यात उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून, वातावरणातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाबुपेठ परिसरातील संबोधीनगर, गौरी तलाव, किरमे प्लॉट या परिसरात डेंग्यू आजार पसरतो आहे. कोरोना संसर्गाच्या भितीने नागरिक सामान्य रूग्णालयात न जाता खाजगी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.
महानगरातील नेहरूनगर, सरकार नगर, भानापेठ, बाबुपेठ, लालपेठ व अंचलेश्वर वॉर्डात प्रत्येकी एक तर नगिनाबाग, आंबेडकर वॉर्डात प्रत्येकी दोन डेंग्युचे रूग्ण आढळून आले आहेत.
बाबुपेठ परिसरातील गणेश एजंन्सी लगतच्या एका रूग्णाचा मृत्यू डेंग्युने झाल्याचा अहवाल खाजगीत आहे. पण, अद्यापही मनपाच्या आरोग्य विभागाकडे तशी नोंद नाह ज्या खाजगी डॉक्टरांकडे डेंग्युचा अहवाल आला आहे. त्याबाबतची तपासणी सुरू आहे. अहवाल प्राप्त करून घेत तशी नोंद घेतल्या जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राजेश मोहिते व स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार यांनी दिली. डेंग्युचा प्रादुर्भाव असलेल्या भागात आवश्यक उपाययोजना करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी स्वच्छता पाळावी, एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. या परिसरातील साथरोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाची चमू तैनात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.