भरवस्तीत कोसळली विज, न्यायाधीशांचे निवासी गाळे सुरक्षित

Bhairav Diwase
राजुरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या किसान वॉर्ड परिसरातील घटना.
Bhairav Diwase.    Aug 03, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील मध्यवर्ती असलेल्या किसान वॉर्ड परिसरात काल संध्याकाळी 7:30 च्या सुमारास विज कोसळण्याची घटना घडली असुन त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, किसान वॉर्ड येथिल पोस्ट ऑफिस कडे जाणार्‍या मुख्य मार्गावर असलेल्या दादाजी भटारकर ह्यांच्या घरासमोरील विद्युत खांबावर विज कोसळली. 

काल संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास शहरात ढगांच्या गडगडाटासह विज चमकत होती. दरम्यान आपल्या घरीच अंगणात बसलेले दादाजी भटारकर ह्यांना अचानक मोठा प्रकाश दिसला व जोरदार आवाज ऐकु आला. त्याचवेळी त्यांचे बंधु मधुकर भटारकर आपल्या दारात बसले होते. त्यांच्या सांगण्यानुसार घरासमोरील विद्युत खांबावर विज कोसळली.

अनेकांनी हे दृष्य बघितले असुन माहिती मिळाली. तिथल्या लोकांकडून माहिती घेतली. ज्या ठिकाणी विज कोसळली त्याच्या अगदी शेजारी न्यायाधीशांची निवासस्थाने असुन विज विद्युत खांबावर कोसळल्याने न्यायाधीश निवासाचे कुठलेही नुकसान झाले नाही. 

परंतु विज कोसळल्याने परिसरातील बर्‍याच लोकांचे टीव्ही संच, पंखे तसेच इतर विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दाट लोकवस्तीच्या भागात विज कोसळण्याची घटना दुर्मिळ असते परंतु काल सायंकाळी घडलेल्या ह्या घटनेने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.