ताडोबा बफर झोनमध्ये शिकार, १० जणांना अटक.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधील मुल वनपरिक्षेत्रात सांबर शिकार प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे. सदर शिकार प्रकरण रविवारी सायंकाळी उघडकीस आले. दरम्यान आरोपींना अटक करण्यात आली असून ८ आरोपी फरार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

ताडोबा बफर झोन मधील मुल वनपरिक्षेत्रात फुलझरी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३५९ मध्ये रविवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी कुत्र्यांना मागे लाऊन एका सांबराला मारले होते.

त्यानंतर आरोपींनी त्याचे मांस आपापल्या घरी नेले. याबाबतची माहिती ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडीया’ यांच्याकडून वनविभागाला मिळाल्यावर वनविभाग पथकाने घरून सांबराचे मांस व साहित्य जप्त केले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली. देविदास सोयाम,मंगेश सिडाम, जयपाल सिडाम, रोशन सिडाम, शुभम अत्राम, अविनाश मडावी, सुरज ढोले, बंडू भंडारी, समाधान ढोले, रामचंद्र कस्तुरे अश्या १० आरोपींना अटक करण्यात आलेली असून सर्व आरोपी हे फुलझरी येथील राहणारे आहेत. या प्रकरणातील आणखी ८ आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.