चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू

Bhairav Diwase
रुग्णांच्या सेवेत संवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देणार

बेडच्या उपलब्धते विषयी मोबाईल ॲपद्वारे माहिती मिळणार

कोरोना संदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक

पुढील आठवड्यात 1 हजार बेडची उपलब्धता
Bhairav Diwase.    Sep 21, 2020


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
आतापर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल रुग्णांना देण्यात येत नव्हता, मात्र यापुढे रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो असेल तो त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नियोजन भवन मध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, सर्व पक्षांचे प्रतिनिधी यांची जनता कर्फ्यू संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, बल्लारपूर उपविभागीय अधिकारी संजय डाहुले तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज तसेच व्यापारी मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.


25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हाभरात जनता कर्फ्यू:

जनता कर्फ्यू संदर्भात आणि जिल्ह्यातील इतर समस्या संदर्भात नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, मागील जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी झाला आहे. या कर्फ्यू नंतर संभावित रुग्णसंख्या पेक्षा 256 नी दैनंदिन रुग्ण संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता वाढणारी रुग्ण संख्या बघता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा जनता कर्फ्यूची आवश्यकता आहे. लोकांना चार दिवसाचा अवधी देऊन 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर व्यापारी संघटना, छोटे दुकानदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

हेल्पलाईन क्रमांक:

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि महिला रुग्णालय येथे नागरिकांना कोरोना संदर्भात कोणतीही माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री 1077 तसेच, 07172- 251597 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुढील आठवड्यात 1 हजार बेडची उपलब्धता:

वाढती रुग्ण संख्या बघता शासकीय महाविद्यालयात 100 बेड वाढविण्यासंदर्भात युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच महिला रुग्णालयात 450 बेड उपलब्ध करून देण्यासाठीचे काम देखील सुरू आहे. यातील 100 बेड पुढील आठवड्यात तसेच 350 ऑक्सिजन बेड सुद्धा पुढील आठवड्यात उपलब्ध होतील. त्याचबरोबर सैनिकी शाळेत 400 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पुढील आठवड्याभरात जवळपास एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय राजूरा, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथे 100 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय शहरातील 17 खाजगी रुग्णालय अधिग्रहित करून कोरोना रुग्णांसाठी तेथील बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे.