श्री आनंद नागरी सहकारी बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेची दुबार चोरी.

Bhairav Diwase

वरोरा पोलीसासांठी आव्हान.
Bhairav Diwase.    Sep 09, 2020

(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- तालुक्यातील वरोरा - माढेळी मार्गावरील पांझूर्णी येथे अब्दुल कादर शेख मोहम्मद यांची मालकीचा असलेला गिट्टी क्रेशर थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शासनाने श्रीआनंद नागरी सहकारी बँकेच्या ताब्यात दिला. बॅंकेच्या या मालमत्तेवर चोरांनी डल्ला मारीत येथील मशिनरी व साहित्य चोरल्याची तक्रार  बँकेच्या वतीने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आली आहे.  तक्रारीच्या काही तासांनंतर पुन्हा चोरांनी मिक्सर मशीन, पार्ट चोरल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. या संदर्भात वरोरा पोलीस अधिक तपास करीत आहे.
      प्राप्त माहिती नुसार वरोरा - माढेळी मार्गावरील मौजा पांझूर्णीच्या उत्तर दिशेवरील शेत शिवार सर्वे नं - १५९/३, आराजी १.६६ हे. आर (१६६०० चौ.मी. ) चे  भोगवटदार अब्दुल कादर शेख मोहम्मद हे होते. यांची मालमत्ता व तेथील सर्व चीज वस्तू थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तत्कालीन नायब तहसीलदार रमेश कोळपे वरोरा यांनी १०/७/२०१८ ला पंचासमक्ष श्रीआनंद नागरी सहकारी बँकेच्या ताब्यात दिले होते. ही मालमत्ता बँकेच्या ताब्यात असताना ६ सप्टेंबर २०२० रोजी पांझूर्णी येथून अज्ञात चोरांनी किर्लोस्कर कंपनीचा मोठा जनरेटर चोरुन नेला. बँकेला या बाबत कळताच ८ सप्टेंबर २०२० रोजी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात वरोरा पोलीसांनी कारवाईला सुरुवात करण्याआधीच चोरांनी याच ठिकाणाहून मिक्सर चूरी ( डस्ट ) मशीन, त्याचे संपूर्ण पार्ट कापून घेऊन गेल्याचे कळते. या बाबतची माहिती वरोरा पोलिसांना देण्यात आली आहे. वरोरा पोलिस स्टेशन मध्ये चोरीची तक्रार दाखल केल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा चोरीची घटना घडते. दोन दिवसात एकाच ठिकाणाहून दोनदा चोरी ची घटना वरोरा पोलिसांना  मोठे आव्हान आहे. हे भंगार चोरांचे काम आहे की तालुक्यात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
      बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे असे नुकसान बँकेसाठी नुकसानीचे ठरत असले तरी, हे प्रकरण वरोरा पोलिसांसाठी ही आव्हान ठरत आहे.