Bhairav Diwase. Sep 09, 2020
या मागणी संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्यायमंत्री, सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांना पत्रे पाठविली आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या योजनांचे महाराष्ट्रात साधारणतः 34 लक्ष लाभधारक आहेत. भाजपा सरकारच्या काळात 18 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. 600 रू वरून 1000 रू. तर 2 अपत्ये असणा-या व्यक्तींना 1200 रूपये अशी वाढ या योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. सदर योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान जून 2020 पासून थकित आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना आधीच आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. अशा पध्दतीने गोरगरीबांच्या हक्काचे पैसे थकित राहणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. हातावर पोट घेवून जगणा-या सदर लाभार्थ्यांचे थकित अनुदान तातडीने देण्याची आवश्यकता आहे. याशिवाय पुढील दोन महिन्यांचे अनुदानही त्यांच्या खात्यात जमा करण्याची आवश्यकता आहे. शासनाने अशा पध्दतीने अनुदान थकित ठेवून गोरगरीब जनतेला त्रास होईल या पध्दतीने वागणे निश्चीतच संयुक्तीक नाही. राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजना व विशेष सहाय्याच्या अन्य योजनांच्या लाभार्थ्यांचे जुन महिन्यापासून थकित असलेले अनुदान त्वरीत द्यावे अन्यथा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, असा ईशारा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.