चंद्रपूर जिल्‍हयात लॉकडाऊन होणार नाही:- सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्‍हयात दिनांक 3 सप्‍टेंबर पासून कोणत्‍याही प्रकारचा लॉकडाऊन करण्‍यात येणार नाही, असे स्‍पष्‍ट आश्‍वासन राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. हा लॉकडाऊन एखादया वार्डापुरता किंवा मर्यादीत भागापुरता असू शकेल मात्र संपूर्ण जिल्‍हयात लॉकडाऊन होणार नाही, असे मुख्‍य सचिवांनी स्‍पष्‍ट केले आहे.

चंद्रपूर जिल्‍हयात 3 सप्‍टेंबर पासून लॉकडाऊन करण्‍याचे सुतोवाच जिल्‍हाधिकारी गुल्‍हाने यांनी केले होते. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांशी चर्चा केली. चंद्रपूर जिल्‍हयातील व्‍यापारी बांधव, विद्यार्थी तसेच हातावर पोट घेवून  जगणारे नागरीक यांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने लॉकडाऊन करणे संयुक्‍तीक नसल्‍याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. देशात अनलॉक करणे सुरू असताना अशा पध्‍दतीने लॉकडाऊन करणे हे गरीबांवर अन्‍यायकारक आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे यात मुळीच दुमत नाही मात्र लॉकडाऊनऐवजी खबरदारीचे उपाय, सावधानी बाळगणे, सॅनिटायझेशन यासह गरीबांना मदत करण्‍याची आवश्‍यकता आहे. पूर्व पदावर येणारे जनजीवन लॉकडाऊनमुळे पुन्‍हा विस्‍कळीत होईल म्‍हणून लॉकडाऊन करू नये, असे आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान म्‍हटले.