दिनांक 26 सप्टेंबर रोजी 1000 खाटांचे कोविड रूग्णालय खनिज विकास निधीतुन स्थापन करण्यासाठी भाजपातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील कोविड रूग्णांच्या उपचारासाठी शकुंतला लॉन येथे उभारण्यात येणा-या 700 खाटांच्या जंबो कोविड रूग्णालयाच्या उभारणीवरून अकारण भारतीय जनता पार्टीला गोवले जात असून याच्याशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. भाजपा हा दीन, दुर्बल, शोषित, पिडीत जनतेच्या हितासाठी, कल्याणासाठी कार्य करणारा पक्ष आहे. आम्ही शासकीय पातळीवर 1000 खाटांचे रूग्णालय कोविड रूग्णांना निःशुल्क उपचार देण्यासाठी खनिज विकास निधीतुन स्थापन करावे अशी मागणी केली आहे व ही मागणी पूर्ण करावी अन्यथा आम्ही आंदोलनाची भूमीका घेतली आहे, असे भाजपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शकुंतला लॉन येथे उभारण्यात येणा-या 700 खाटांच्या जंबो कोविड रूग्णालयाच्या उभारणीवरून विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिध्द होत असून यात भाजपाची अकारण बदनामी केली जात आहे. भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी शकुंतला लॉन येथील जंबो हॉस्पीटल संदर्भात कोणताही प्रस्ताव महानगरपालिकेला सादर केलेला नाही. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने यासंदर्भातील प्रस्तावाला दिलेली तत्वतः मान्यता ही प्रशासकीय पातळीवरील बाब असून त्याच्याशी पदाधिका-यांचा कोणताही संबंध नाही. अशा पध्दतीचे शकुंतला लॉन येथील जंबो हॉस्पीटल उभारण्यात येत असेल तर ते योग्य आहे किंवा नाही, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे किंवा नाही ही बाब जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्य यंत्रणेचे प्रमुख यांनी तपासून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र अकारण यात भाजपा पदाधिका-यांवर आरोप केले जात आहे जे पूर्णतः निराधार व चुकीचे आहे. जिल्हाधिका-यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि हा प्रस्ताव जर गोरगरीब जनतेच्या हिताचा नसेल तर तो त्वरीत रद्द करावा आणि 1000 खाटांचे अत्याधुनिक कोविड रूग्णालय कोविड रूग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी खनिज विकास निधीतुन स्थापन करावे अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे.
1000 खाटांचे अत्याधुनिक कोविड रूग्णालय कोविड रूग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी खनिज विकास निधीतुन स्थापन करावे या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले असून 48 तासांच्या आत निर्णय न घेतल्यास आम्ही आंदोलन करू असा ईशारा दिला आहे. त्यानुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी आम्ही भाजपातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे यांनी जाहीर केले आहे.