(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- काही सामाजिक चालीरीती व अंधश्रद्धा यामुळे काही कुटुंबामध्ये अनेक वेळा लैंगिक शोषण व अत्याचार हा प्रकार सामाजिक स्तरावर रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनासोबतच सामान्य जनतेचा संबंध येणाऱ्या समाजातील मान्यवरांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे. लॉकडाऊन काळामध्ये बालविवाह होत आहे तसेच घरातून बालकांचे पळून जाण्याचे प्रकारही वाढले आहे. आजच्या तांत्रिक युगात बालकांवर स्मार्टफोनचा झालेला परिणाम तसेच एकमेकांना मेसेजेस करणे, प्रेम प्रकरण प्रस्थापित करणे असे प्रकार शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत.
अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेणे व त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित करणे, यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पालकांनी जागृत राहणे ही काळाची गरज आहे.
शहरी किंवा ग्रामीण भागात बालविवाह, बालकांवर होणारे अत्याचार, बालकामगार,फुस लावून पळवून नेणे,अनैतिक व्यापार अशा घटना घडत आहेत. बालकांसंबंधी असे प्रकार घडू नये म्हणून गाव पातळीवर बाल ग्राम संरक्षण समितीत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तसेच तालुका पातळीवर तालुका बाल संरक्षण समितीत, तहसीलदार एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बाल संरक्षण समितीमध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी, व पोलीस विभाग, अध्यक्ष बालकल्याण समिती, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व प्रभाग बाल संरक्षण समिती अध्यक्ष नगरसेवक, अंगणवाडी शिक्षिका आणि इतर बालकांशी निगडीत कार्य करणाऱ्या शासकीय यंत्रणा तसेच गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंध अधिकारी (ग्रामसेवक) त्यांची सहायक अंगणवाडी सेविका, बालविवाह व बालकांवर होणारे अत्याचारासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे.
तक्रार व माहितीसाठी चाइल्ड लाईन मदत क्रमांक (टोल फ्री) 1098, जवळचे पोलीस स्टेशन, किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष मोबाईल क्रमांक 7972849974, 8412016248 या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने जिल्हा स्तरावर शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी बालविवाह, बालकांवर होणारे अत्याचार, शोषण, महिला सक्षमीकरण या विषयावर लॉकडाऊन काळात प्रबोधनपर जनजागृती सुरू असून पोक्सो बाबत माहिती देणारे फोमशिट, बॅनर लावण्यात येत आहे.