आपण किन्ही गाव दत्तक घ्यावे, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीसांना विनंती.

Bhairav Diwase
वैनगंगा नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका किन्ही गावाला.
Bhairav Diwase.    Sep 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- कोणत्याही प्रकारची सूचना न करता गोसेखुर्द धरणाचे ३३ ही दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांनाही मोठा फटका बसला आहे. लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतक-यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे, घरे पूर्णपणे नष्‍ट झाली आहेत, गोठे नष्‍ट झाले आहेत, जनावरे वाहून गेली आहे.

पण तालुक्यातील सर्वाधिक फटका हा किन्ही गावाला बसला आहे. या गावातील ७५ - ८० घरे नष्ट झाले आहे, लोकांच्या घरात पाणी घुसल्याने घरात असलेल्या सर्व गोष्टी खराब झाल्या आहेत, घरात साठवलेला धान, डाळ, बिजाई, गॅस, शेगडी, कपडे, भांडे वाहून गेली आहे. अक्षरशः लोक ब्रम्हपुरी - आरमोरी महामार्ग येऊन बसले आहेत. किन्ही जवळील १०० मीटरचा रस्त्याच्या बाजूची कड वाहून गेली आहे. किन्ही मधील गोसेखुर्द चा कालवा ही फुटला आहे. या कारणाने किन्ही गावाच्या पुनर्वसनासाठी हे गाव दत्तक घेण्याची विनंती ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांना केली आहे.

दिनांक 3 सप्‍टेंबर रोजी ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील काही पुरग्रस्‍त गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी भेटी देत पाहणी दौरा केला. यावेळी माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ऊर्जा मंत्री व भाजपा प्रदेश महामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी राज्यमंत्री आ.डॉ. परिणयजी फुके, खा. अशोक नेते,आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन जनावरांसाठी 40 हजार टन चारा वितरीत करण्‍याची घोषणा केली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पंचनामे करण्‍याची पध्‍दत वेळकाढू असते, त्‍यामुळे या पंचनाम्‍याच्‍या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्‍यासाठी व पुरग्रस्‍तांना योग्‍य न्‍याय मिळावा यासाठी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील, असेही त्‍यांनी जाहीर केले. पुरग्रस्‍त गावांमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन त्‍वरीत निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेण्‍यात येईल तसेच बोअरवेल दुरूस्‍तीसाठी त्‍वरीत पथक पाठविण्‍यात येईल, असेही त्‍यांनी यावेळी जाहीर केले.