उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांना हादरा.

Bhairav Diwase
कोसमी-किसनेली चकमकीचा परिणाम.
Bhairav Diwase. Oct 27, 2020
गडचिरोली:- छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर उत्तर गडचिरोलीच्या कोरची-धानोरा भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींमध्ये झालेली वाढ बघता पोलीस दलाने आक्रमक पावले उचलली आहेत. खबऱ्यांकडून माहिती मिळताच सी-६० पथकाने कोसमी-किसनेलीच्या जंगलात नक्षलवाद्यांना खिंडीत पकडले. या चकमकीत सी-६० पथकाला पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. मागील दोन वर्षांतील ही सर्वात मोठी चकमक आहे. यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.


तीन वर्षांपूर्वी:-
कसनासूर-बोरियाच्या जंगलात एप्रिल २०१८ मध्ये ४० नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर माओवादी चळवळ मंदावल्याचे आशादायी चित्र गडचिरोली जिल्हय़ात निर्माण झाले होते. मात्र तेव्हाची शांतता वरवरची होती. कारण जंगलात नक्षलवाद्यांचे दलम अधिक सक्रियपणे काम करीत होते. त्याचा परिणाम दक्षिण गडचिरोलीच्या एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, भामरागडप्रमाणेच उत्तर गडचिरोलीतील कोरची, धानोरा या भागात नक्षलवाद्यांच्या हालचालींना वेग आला होता. त्यातूनच १ मे महाराष्ट्रदिनी कुरखेडा या तालुक्याच्या ठिकाणाहून काही कि.मी. अंतरावरील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस शहीद झाले. नक्षलवादी उत्तर गडचिरोलीत अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांवर वचक निर्माण करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आक्रमकपणे काम करण्यास सुरुवात केली.

कोरची व धानोरा या दोन तालुक्यात:- 
छत्तीसगड-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात टिपागड, प्लाटून व कोरची दलम सक्रिय होत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. कधी कधी गावात मुक्काम करणे आणि स्थानिकांना प्रलोभन दाखवून आदिवासी मुलांना चळवळीत सक्रिय करीत असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली होती.

कोसमी-किसनेली गावालगतच्या जंगलात प्लाटून, टिपागड व कोरची असे तिन्ही दलम एकत्र आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सी-६० पथक पोहचणे आणि नक्षली जाण्यास सुरुवात होण्याची वेळ एकच झाली आणि तिथेच जंगलात नक्षलवादी- सी-६० पथकाची गाठ पडली. यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली असता सी-६० पथकाने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात पाच नक्षलवादी ठार करण्यात सी-६० पथकाला यश आले.

नव्या दमाचा चमू:-
पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली झाल्यानंतर एक महिन्यात गडचिरोली पोलीस दलाला नक्षलवाद्यांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात यश आले आहे. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या पाठीशी गडचिरोली पोलीस अधीक्षकपदाचा अनुभव आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नक्षल अभियान अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्यासह बहुतांश उपविभागीय पोलीस अधिकारी नवीन आहेत. अशा सर्व नव्याने रुजू झालेल्या चमूने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

यावर्षी १० नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले असून यंदाची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन टिपागड, दोन प्लाटून व एक कोरची दलम सदस्य आहे. गडचिरोली पोलीस दलाने अधिक आक्रमकपणे नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. 
अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, 
गडचिरोली जिल्हा

यावर्षी १० नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले असून यंदाची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन टिपागड, दोन प्लाटून व एक कोरची दलम सदस्य आहे. गडचिरोली पोलीस दलाने अधिक आक्रमकपणे नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. 
संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक,
गडचिरोली जिल्हा


सी-६० पथकाने नक्षलविरोधी अभियानात ५ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढले आहे. भविष्यातही गडचिरोली पोलीस दलाकडून अशाच कारवाईची अपेक्षा आहे.
एकनाथ शिंदे, पालकमंत्री 
गडचिरोली जिल्हा