Bhairav Diwase. Oct 28, 2020
वरोरा:- चिमूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या एसआरके कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजवर अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, कंपनी व्यवस्थापन आपल्या हेकेखोरपणामुळे या महामार्गाचे काम त्वरित करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाने कंपनीच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन व रक्तदान करून कंपनी व्यवस्थापनाचा निषेध नोंदविला.
अखेरीस येत्या १५ दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
मागील काही वर्षांपासून या महामार्गाचे काम एसआरके कंपनीमार्फत केले जात आहे. अतिशय संथगतीने या महामार्गाचे काम केले जात असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते खोदून ठेवणे, काम न करणे आदी प्रकारांमुळे अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या. यात अनेकांना अपंगत्व आले. नागरिकांच्या या समस्यांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आशिष घुमे व अक्षय बोंदगुलवार यांच्या नेतृत्वात भेंडाळा येथील कंपनीच्या कार्यालयासमोर रक्तदान तथा ठिय्या आंदोलन करून याकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये 45 रक्त दात्यानी रक्तदान केले.
*रस्त्याचे काम जलद गतीने करा, स्थानिकांना कामावर घ्यावे, कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व अपंगत्व आलेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक धुळीमुळे नष्ट होत असल्याने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, कागदपत्रेव इतर दस्ताऐवज नसलेली कंपनीकडील वाहने जोत करण्यात यावी, कंपनीच्या वाहनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत द्यावी व अपंगत्व आलेल्यांना १० लाखांची मदत द्यावी, आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाला प्रहार वाहन चालक संघटनेचे समर्थन होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आशिष घुमे, प्रहार वाहन चालक संघटनेचे प्रवीण वाघे, शेरखान पठाण, राहुल पडाव, मुजमिल शेख, सुहास हेपट, अमोल दातारकर, राकेश भुतकर, गणेश उराडे, किशोर डुकरे, रमेश सनस, नितीन जुमडे, प्रमोद देठे, राहुल देठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.