नागपूर पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी......

Bhairav Diwase
काँग्रेस भाजपचा किल्ला भेदणार? की भाजप गड राखणार?
Bhairav Diwase.     Nov 18, 2020
नागपूर:- विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपात थेट सामना रंगणार आहे. मंगळवारी सात उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता 19 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी उमेदवार आहेत. या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर काँग्रेसचे मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि सुनिल केदार यांच्यासाठीही येथे विजय मिळवणं महत्त्वाचं झालं आहे.


'नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघ'... हा मतदारसंघ राज्यात ओळखला जातो तो भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे.

2014 पर्यंत नितीन गडकरींनी सलग अडीच दशकांपेक्षा अधिक काळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं. गडकरींपूर्वी इथून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनीही या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं. गेल्या पाच दशकांपासून हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या या बालेकिल्ल्याला धडक देण्यासाठी काँग्रेस चांगलीच सरसावली आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या प्रा. अनिल सोलेंनी काँग्रेसच्या बबनराव तायवाडे यांचा 31,259 मतांनी पराभव केला होता. सध्या राज्यात महाआघाडीचं सरकार असल्याने राष्ट्रवादीसोबत शिवसेनाही येथे काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने अभिजीत वंजारींना रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले नागपूरचे महापौर संदीप जोशींना रिंगणात उतरवलं आहे.


मात्र, या मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने भाजप आपल्या विजयाची गणितं मांडताना दिसत आहे. तर काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारींनी दोन वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी केल्याने त्यांचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.


नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. फार मोठ्या भौगोलिक विस्तारामुळे या मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांची प्रचंड दमछाक होणार आहे. भाजप आणि काँग्रेस उमेदवारांशिवाय येथे वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विदर्भवादी संघटनांचे नितीन रोंघे आणि मानवाधिकार पक्षाच्या ॲड. सुनिता पाटील हे महत्वाचे उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या मतविभागणीवरही भाजप-काँग्रेसच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. सर्वच उमेदवार आकर्षक जाहीरनाम्यातून पदवीधरांना चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत.


2014 चा निवडणूक निकाल.......

उमेदवार पक्ष, मते.
प्रा. अनिल सोले भाजप 52,485
बबनराव तायवाडे काँग्रेस 21,226
किशोर गजभिये अपक्ष 19,455


विजयी उमेदवार:- प्रा. अनिल सोले भाजप, 31,259 मतानी विजयी.


2020 मधील नागपूर पदवीधर निवडणूक.....

कुठे किती मतदान केंद्रे?

जिल्हा एकूण केंद्र.
नागपूर:- 162
भंडारा:- 31
गोंदिया:- 21
वर्धा:- 35
चंद्रपूर:- 50
गडचिरोली:- 21
एकूण 320


नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या पाच दशकांपासून संघ आणि पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला काँग्रेस हादरे देणार का? की पाच दशकांची विजयी घोडदौड भाजप कायम ठेवणार? गडकरी-फडणवीस आपला प्रतिष्ठा राखणार? राऊत-वडेट्टीवार-केदार काँग्रेस पक्षाला खरंच विजयश्री मिळवून देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहेत.