Top News

पोंभुर्णा नगर पंचायत निवडणूकीचे लागले गावपुढाऱ्यांना वेध.

मोर्चे बांधणी सुरू; नगरविकास आघाडी कडे सर्वांचे नजरा.
Bhairav Diwase. Dec 10, 2020
पोंभुर्णा:- पोंभुर्णा नगर पंचायत निवडणूकीकरीता प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले होते. दिवाळी गिफ्ट वाटप प्रक्रिया जोमात सुरू असतानाच नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते त्या निवडणूकीसाठी जोमाने भिडले. आपापल्या प्रभागात पदवीधर निवडणूकीचा प्रचार करतानाच स्वतः च्या ही उमेदवारीचा सुतोवाच करीत होते. 
  
      राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पोंभुर्णा नगर पंचायतीत देखील तोच प्रयोग यशस्वी होईल, या आशेवर काही नेते डोळे लावून बसले आहेत. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या गठबंधनाच्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळे सन्मानजनक तोडगा न निघाल्यास स्वबळाची तयारी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दोन ते तीन जागांवर तडजोड करण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपनेही सर्व प्रभागावर लक्ष केंद्रित करून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांचे होमग्राउंड असल्याने त्यांचे याकडे विशेष लक्ष असणार आहे. 
      

     भाजपाकडे तगडे उमेदवार असल्याने ते गटागटाचे राजकारण करून स्वत:च्या अखत्यारीत अधिकाधिक जागा खेचून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आरक्षणामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांची भंबेरी उडाली असून ते इतर प्रभागावर लक्ष केंद्रित करून आहेत. एकूण १७ प्रभागापैकी पाच प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहेत. त्यातील प्रभाग क्र. ५ व ७ मध्ये जातीय राजकारण चालण्याची चिन्हे पाहता, इतरांसाठी तिनच प्रभाग फक्त शिल्लक आहेत. त्या जागांवर अनेक जण दावे ठोकत आहेत. काहिनी माघार घेण्याकरिता आपल्या पत्नीसाठी महिला राखीव असलेल्या प्रभागावर दावे ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. 
             

        पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीत मनसे आपल्या जागा लढवणार असून त्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे 17 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. पोंभुर्णात जागा लढविण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भविष्यात पोंभुर्णा नगरपंचायत कुणाची सत्ता येणार याकडे पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांच लक्ष लागले आहे.


        राष्ट्रवादी व शिवसेनेच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचा निर्णय अवलंबून असेल तर कांग्रेस व भाजपातील बंडाळीवरून नगरविकास आघाडीचा जन्म झाला आहे. संभाव्य निवडणुकीची राजकीय पक्षांची व्युहरचना कशीही असली तरी कांग्रेस, भाजपातील तगडे उमेदवार विरोधात नगरविकास आघाडी चे उमेदवार आपापल्या प्रभागात आतापासूनच प्रतिस्पर्ध्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात यशस्वी झालेले दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व राजकीय पक्ष व त्यांचे नेते कसा राजकीय सारिपाठ तयार करतात,आणी नगरविकास आघाडी याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने