जीवनाभिमुख साहित्यकृतीच मोठी होत असते:- डॉ. श्याम मोहरकर

Bhairav Diwase
फिनिक्स तर्फे गोपाल शिरपूरकरांच्या 'माह्यी परदेस वारी' चे प्रकाशन व कविसंमेलन.
Bhairav Diwase Dec 07, 2020
चंद्रपूर:- कोणतीही कलाकृती तेव्हाच मोठी होते, जेव्हा ती जीवनाभिमुख असते. लेखकाचे आपल्या स्वानुभवाशी असलेले सच्चेपण आणि त्याची तादात्म्यवृत्ती हे अद्वैत साहित्यकृतीला मोठे करतात. व-हाडी व झाडीबोलीत लिहिलेले शिरपुरकरांचे प्रवासवर्णन उत्तम आणि आश्वासक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक, समीक्षक डॉ.श्याम मोहरकर यांनी केले. चंद्रपूरातील प्रतिथयश लेखक गोपाल शिरपूरकर यांच्या 'माह्यी परदेस वारी' या प्रवासवर्णन पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख भाष्यकार म्हणून ते बोलत होते.  

फिनिक्स साहित्य मंचतर्फे पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी पोंभुर्णा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उद्घाटक प्रशांंत आर्वे तर अतिथी म्हणून कृष्णाजी नागपूरे उपस्थित होते. प्रशांत आर्वे म्हणाले, साहित्यात ढोंगीपणा उघड होत असतांना त्यापासून दूर राहत, माणसं तोडण्याच्या काळात माणूस जोडण्याचं काम शिरपूरकर लेखनातून करत आहेत असे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानाहून गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे यांनी लेखक अनुभवाशी व भाषेशी प्रामाणिक राहून इतरांना प्रवासासाठी नवी दृष्टी देत असल्याचे अधोरेखित केले.

याप्रसंगी फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवी प्रदिप देशमुख, नंदिनी कन्नाके, राहुल दहिवले यांच्या साहित्यकृतीस फिनिक्स प्रतिभा पुरस्कार तर कार्यकर्ते कवी उमेश पारखी, संगिता धोटे यांना सामाजिक योगदानाबद्दल फिनिक्स सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुन्ना गेडाम व मिलेश साकुरकर यांना फिनिक्स कार्यकर्ता पुरस्कार व आदर्श तथा स्मार्ट ग्राम घाटकुळचे ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन जयवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रविण आडेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. कविसंमेलनाचे संचालन सुनिल बावने तर पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे कवी नरेशकुमार बोरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाटेकर, बि.सी. नगराळे, सुरेंद्र इंगळे, सुधाकर कन्नाके, यांनी सहकार्य केले.