"बोकड पार्टी" चा गडचांदूर पोलिसांनी घेतला मनसोक्त आस्वाद!
Bhairav Diwase. Dec 15, 2020
चंद्रपूर:- सध्या चंद्रपुर जिल्ह्यात दारू तस्कर व पोलीस यांच्या घनिष्ठ संबंधाविषयी अनेक चर्चा ऐकायला मिळतात. काही सत्य असतात तर काही मध्ये थोडे बहूत "तथ्य" असते. निरर्थक असे वृत्त पसरत नसतात. असे अनेक वृत्त आपण वाचून-ऐकून विसरून जातो, परंतु भविष्यात त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावेचं लागतात. पोलीस विभागाविषयी अशा अनेक चर्चा, तर्क-वितर्क समोर येत असतात, अशीच कोरपना तालुक्यातील गडचांदुर पोलिस स्टेशन हद्दीत घडली.
रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजी गडचांदूर येथे गडचांदूर पोलिसांना एका दारूवाल्याकडून "बोकडा"च्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नांदाफाटा परिसरात दारूचा व्यवसाय करणाऱ्या दोन बंधूंनी पोलिसांना ही मेजवानी दिली व त्या ठिकाणी पोलिसांनी इमाने-इतबारे आपली हजेरी दर्शविली. गडचांदूर शहरांमध्ये या "बोकड पार्टी"ची खमंग चर्चा सुरू आहे. काही मस्त-मौला खवय्यांनी या पार्टीतील "सेल्फी" काढली व त्या ठिकाणी झालेली मौज-मस्ती आज गडचांदूरात चर्चेचा विषय आहे, या "बोकड" पार्टीविषयीचा तपास कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व नुकतेच गडचांदूर येथे रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांनी अवश्य करावा.
सविस्तर वृत्त असे की, रविवार दिनांक 13 डिसेंबर रोजी गडचांदूर येथील "****जी" सेलिब्रेशन या हॉलमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रविवार असल्यामुळे ही पार्टी नाॉनव्हेज होती. या "बोकड" पार्टीचे आयोजन नांदाफाटा येथील दारू व्यावसायिक असलेल्या बंडीवार या दोन बंधूंनी केली होती. उपस्थितांना व स्टाफ कर्मचाऱ्यांना आश्चर्य तर त्या वेळेस झाले, ज्यावेळेस या पार्टीमध्ये फक्त गडचांदूर पोलिसांनीच जास्तीत जास्त प्रमाणात हजेरी लावली. ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वातील गडचांदुर पोलीस नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. रविवार ला झालेली "बोकड पार्टी" व त्यात गडचांदूर पोलिसांची उपस्थिती यामुळे नांदाफाटा च्या "त्या" दारूवाल्या दोन बंधूंनी या पार्टीचे आयोजन फक्त पोलिसांसाठी केले होते, याची खमंग चर्चा आज गडचांदूर शहरांमध्ये सुरू आहे. या "बोकड पार्टी" चा पोलीस अधीक्षक व गडचांदूर चे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा व या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांची कायदेशीर चिरफाड करावी, ही अपेक्षा जर गडचांदूरकरांनी बाळगली तर त्यात अतिशयोक्ती नाही. महत्त्वाचे म्हणजे गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (sdpo) हे नांदाफाटा येथेच आहे व त्याच ठिकाणी चा दारू व्यवसायिक जर गडचांदूर मध्ये पोलिसांसाठी "बोकड पार्टी" चे आयोजन करत असेल व त्या पार्टीत पोलीस कर्मचारी उपस्थित राहून त्याचा आस्वाद घेत असेल तर ही बाब समाजासाठी घातक आहे याचा विचार अवश्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करायला हवा.