भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग.

Bhairav Diwase
दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू. तर सात जणांना वाचवण्यात यश.
Bhairav Diwase.    Jan 09, 2021
भंडारा:- महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.


जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.

त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

   या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.

      दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.