क्रूर बापानं चिमुकलीला आदळलं दारावर; क्षणाधार्त होत्याचं झालं नव्हतं.
गोंदिया:- रागाच्या भरात कोण कधी आणि काय करेल काहीही सांगत येत नाही. एकदा राग अनावर झाला कि आपण काय करतोय स्वतःच स्वतःला कळत नाही. मात्र गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. स्वतःच्या मुलीसोबत एका क्रूर बापानं अक्षरशः अमानुष कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
विनाकारण रडते म्हणून, रागाच्या भरात वडीलाने पोटच्या मुलीला दरवाजावर आदळले. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील लोणारा येथे घडली. वैष्णवी विवेक उईके ( वय एक वर्ष आठ महिने) असे मृत मुलीचे नाव असून, पोलिसांनी आरोपी वडीला विवेक उईके ( वय 28, रा.लोणारा) याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
वैष्णवी रडत असल्याने तिच्या आईने पती विवेक उईके याला खाऊसाठी पाच रुपये मागितले. मात्र, त्याने पैसे दिले नाही. याचवेळी मुलगी वैष्णवी ही जोरात रडत होती. त्यामुळे विवेकने विनाकारण रडते म्हणून तिला उचलून दरवाजावर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपी विवेक उईके याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.