Top News

एम. एस. धोनी, केसरी चित्रपटात काम करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase.    Feb 16, 2021
मुंबई:- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून आता कुठे सर्व जण सावरले असताना आता आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूने बॉलिवूडला हादरला दिला आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याने सुशांत सिंह राजपूतसोबतही काम केलं होतं. हा अभिनेता म्हणजे संदीप नाहर.

संदीप नाहरचा मृतदेह मुंबईतील गोरेगावमधील त्याच्या राहत्या घरात सापडला आहे. त्यानं आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. त्याची एक फेसबुक पोस्टही व्हायरल होते आहे. ज्यामध्ये त्यानं आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. या पोस्टचाही पोलीस तपास करत आहेत.

या फेसबुक पोस्टवर संदीप म्हणाला, "आयुष्यात खूप सुखदु:ख पाहिलं. प्रत्येक समस्येचा सामना केला. पण आता मी ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती मी सहन करू शकत नाही. आत्महत्या करणं योग्य नाही मला माहिती आहे. मलाही जगायचं होतं. पण जिथं सेल्फ रिस्पेक्ट नाही, समाधान नाही तिथं जगून काय फायदा. माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शरमा यांनी मला कधीच समजून घेतलं नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको खूप रागिष्ट आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. दररोज क्लेश सहन करण्याची शक्ती आता माझ्यात नाही"

"यात कांचनचीही काही चूक नाही कारण तिचा स्वभाव असा आहे, की तिला हे सर्व सामान्य वाटतं. पण माझ्यासाठी हे सामान्य नाही. मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधी खचलो नाही. बाऊन्सर होतो, डबिंग केलं, जीम ट्रेनरही होतो. वन रूम किचनमध्ये सहा जण राहायचो. स्ट्रगल करत होतो पण समाधानी होतो. आज मी काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. दोन वर्षांपासून आयुष्य पूर्ण बदललं आहे आणि हे सर्वकाही मी कुणासोबत शेअरही करू शकत नाही. जगाला वाटतं आमचं सर्व किती चांगलं सुरू आहे. कारण ते आमचे सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सर्वकाही खोटं असतं. जगाला दाखवायला. इमेज चांगली राहावी यासाठी हे टाकतो पण खरं एकदम विरुद्ध आहे. आमचं अजिबात पटत नाही"

"मी आत्महत्या खूप आधीच केली असती. पण मी स्वतःला वेळ दिली. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केलं. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदानं उचलावं लागेल. इथं या आयुष्यात नरक मिळालं कदाचित इथून गेल्यानंतर तिथलं आयुष्य कसं असेल मला माहिती नाही. पण मला इतकं माहिती आहे, मी त्याचा सामना करेन. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीही बोलू नका, फक्त तिच्या मेंदूचा उपचार जरूर करून घ्या, असं त्यानं म्हटलं आहे"


संदीपनं सुशांतसोबत एम एस धोनी द अनटोल्ड (M.S. Dhoni: The Untold Story) स्टोरी या फिल्ममध्ये काम केलं. यामध्ये त्याने धोनीच्या मित्राची छोटू भैय्याची भूमिका साकारली. याशिवाय केसरी, खानदानी शफाखाना आणि शुक्राणू या फिल्ममध्येही तो दिसला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने