वर्धा:- गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर्वी गावात गॅस सिलिंडरच्या पाईपमधून गॅस लीक होऊन घराला आग लागली. ही घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी ७ वाजता घडली असून यामध्ये एक महिला जखमी झाली आहे.
आर्वी येथील संजय चौके यांच्या पत्नी सकाळी गॅसवर चहा बनवत होत्या. त्यावेळी अचानक रेग्युलेटरजवळील नळीमधून गॅस लीक झाला आणि पेट घेतला. त्यातच त्यांच्या अंगावरील कापड जळाले. पाहता पाहता आगीने संपूर्ण घराला वेढले. घरात त्यांच्या सासू सीताबाई चौके आणि जाऊ कलावती चौके होत्या. शेजाऱ्यांना आगीचे लोंढे दिसताच त्यांनी घराकडे धाव घेतली आणि आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. गावात नळ योजना कार्यान्वित असून पाणी प्रत्येकाकडे उपलब्ध असल्याने घराघरातून पाणी आणून गावकऱ्यांनी आग विझविली. मात्र, या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली.
दरम्यान, जखमी झालेल्या संजय चौके यांच्या पत्नीला गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले.
व्यवसायासाठी आणलेले कपडेही जळाले.......
संजय चौके हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे कपड्यांचा जोड व्यवसाय करून ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच ५० हजार रुपये किमतीचे कपडे विक्रीसाठी आणले होते. ते कपडे देखील या आगीमध्ये जळून खाक झाले. तसेच जखमी झालेल्या दुर्गा चौके या देखील बचत गटाच्या सदस्य असल्याने त्यांची मासिक बचत ५० हजार रुपये घरच्या कपाटात होती. तसेच संजय चौके यांना तूर विक्रीतून मिळालेले ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये किमतीचे दागिने देखील कपाटात ठेवले होते, तर २० क्विंटल कापूस, तूर, हरभरा, गहू, तांदूळ आणि अन्य धान्य देखील या आगीत भस्म झाले. रोजच्या वापरातील कपडे, भांडी संपूर्ण घरातील लाकडी, लोखंडी साहित्य जळून कोळसा झाल्याने त्यांचे दहा लाखाचे नुकसान झाले.