Top News

केव्हाही दुचाकी दुरुस्त करायला धावत येतो कुचन्याचा रामचंद्र.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पोलिस व डाक्टर प्रमाणेच भद्रावती तालुक्यातील कुचना येथील रामचंद्र पद्माकर हिवरे हा  दुचाकी कारागीर २४ तास सेवा देत असून त्याच्या या सेवेचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

         रामचंद्र हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा रहिवाशी आहे. तेथे मोलमजुरीचे काम करुन आपला उदरनिर्वाह करायचा. दरम्यान, सन २००० मध्ये त्याचा कुचना वसाहतीतील एका युवतीसोबत विवाह पार पडला. विवाहानंतर संसाराचा गाडा ओढायला ताण पडू लागला. त्यामुळे त्याने सासुरवाडीचा आश्रय घेतला. सासरे वेकोलिमध्ये नोकरीला असल्याने त्यांच्या मदतीने आपल्याला काही कामधंदा मिळेल या आशेने कुचना गाठले.तेथे पती-पत्नी राहात असतानाच रामचंद्रने दुचाकीचे पंक्चर दुरुस्त करणे आणि दुचाकी रिपेअर करणे यांचे प्रशिक्षण घ्यायचे ठरविले.त्यानुसार वणी ते कुचना जाणे-येणे करुन दोन वर्षे सदर प्रशिक्षण घेतले.त्यानंतर सन २००३ मध्ये वणी-कुचना-वरोडा मार्गावर कुचना येथे पंक्चर दुरुस्ती व दुचाकी रिपेअरिंगचे दुकान थाटले. त्यावेळेस त्यांच्या संसार वेलीवर फुल फुलायचेच होते.त्यामुळे रामचंद्रने आपल्या लहानशा साळ्याचे नाव दुकानाला दिले. त्यामुळे ' महेश आॅटो वर्क्स अॅंड रिपेअरिंग सेंटर' असे दुकानाचे नामकरण झाले. त्यामुळे त्याचे ग्राहक आणि परिसरातील लोक त्याला 'महेश' म्हणूनच ओळखतात. मागिल १० ते १२ वर्षापूर्वी कुचना वसाहतीतील वेकोलि कर्मचा-यांनी दुचाकी दुरुस्त करण्याकरीता आपल्या निवासस्थानी बोलाविले. त्यानंतर इतर लोकही बोलावू लागले. असे करता करता लोकांच्या घरी जाऊन दुचाकी गाड्या दुरुस्त करण्याचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर रामचंद्रने ग्राहकांना २४ तास सेवा देण्याचे ठरविले. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो दुकानात एकटाच काम करतो. यादरम्यान, कोणाची  गाडी दुरुस्तीसाठी काॅल आला तर तो लगेच आपली साहित्याची कीट घेऊन दुचाकीवर निघुन जातो. आतापर्यंत तो वणीच्या पलिकडे शिरपूरपर्यंत, वरोड्याच्या पलिकडे टेमुर्डापर्यंत आणि भद्रावतीच्या पलिकडे तेलवासापर्यंत गाडी दुरुस्तीसाठी जाऊन आला आहे.
        
      दिवसा रात्री,पाण्यापावसात केव्हाही काॅल केल्यावर तो तत्परतेने धावून येतो. त्यासाठी त्याने आपला भ्रमणध्वनी क्रमांक 9623607427 हा दिला आहे. या क्रमांकावर तो उपलब्ध होतो. जाण्यापूर्वी दुचाकीत कोणता बिघाड आहे याची पूर्ण माहिती घेतो. त्यानंतर सोबत कोणते साहित्य घ्यायचे ते तो ठरवितो आणि रवाना होतो. त्यामुळे एखाद्याची दुचाकी रस्त्यात बिघडली असेल आणि रामचंद्र तेथे पोहोचला असेल तर हमखास ती दुचाकी दुरुस्त होऊन त्या दुचाकीचा चालक पुढच्या प्रवासाला निघतो. मात्र चारचाकी वाहन असेल तर पंक्चर दुरुस्त करण्याशिवाय तो काहीही करु शकत नाही.

       याच धंद्याच्या भरोशावर रामचंद्रच्या कुटुंबाची उपजिविका चालते.त्याने कुचना येथे दोन खोल्यांचे स्वत:चे घर बांधले आहे.त्यात पती-पत्नी आणि दोन मुली राहतात. एक मुलगी वरोडा येथे बारावीत विज्ञान शाखेत शिकत आहे.तर दुसरी मुलगी दहावीत इंग्रजी माध्यमात शिकत आहे.केवळ ७ वा वर्ग शिकलेल्या आणि सुरुवातीला मोलमजुरीचे काम करणा-या रामचंद्रची प्रगतीच्या दिशेने होत असलेली वाटचाल आणि त्याची २४ तास सेवा भद्रावती तालुक्यात प्रशंसनिय ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने