Top News

नातेवाईकांची फरफट आणि मृतदेहांची विटंबना होऊ नये म्हणून "तो" निर्णय.

आमचा हेतू प्रामाणिकच; टीका करणाऱ्यांना महापौरांचे उत्तर.
Bhairav Diwase. April 26, 2021
चंद्रपूर:- महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. मृत्यूंची संख्या वाढली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास स्मशानभूमीत जागा अपुरी पडत आहे. मृत्यूनंतरही वेदना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपूरही या दुष्टचक्रातून सुटले नाही. मृतदेहांची विटंबना थांबविण्यासाठी जर स्मशानभूमीतील ओटे वाढविण्याचा निर्णय माणुसकीच्या भावनेतून घेतला असेल तर त्यात आमचे चुकले कुठे, असे उत्तर महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.

कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर पठाणपुरा गेटबाहेरील शिव मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपुरात तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाधितांना उपचार मिळावे, खाटांची संख्या वाढावी, ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, औषधांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी पदाधिकारी आणि प्रशासन दिवसरात्र प्रामाणिकपणे झटत आहेत. चंद्रपुरात ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी दिली. त्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी अनेक शहरात 'वेटिंग' सुरू आहे. लाकडे उपलब्ध होत नाही, जागा अपुरी पडत असल्यामुळे नातेवाईकांना ताटकळत राहावे लागते. ही परिस्थिती भविष्यात चंद्रपुरात उद्भवू शकते. चंद्रपुरात केवळ शहरातीलच नव्हे तर उपचारादरम्यान मृत पावलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींवरही अंत्यसंस्कार होतात. त्यामुळे स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी निवेदन देऊन या गंभीर समस्येकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची तातडीने दखल घेत स्मशानभूमीची पाहणी केली. फरफट होऊ नये म्हणून तेथे सिमेंट काँक्रीटचे प्लॅटफॉर्म तातडीने बांधण्याचे आदेश दिले, ज्याचे कामही सुरू झाले. मात्र याचेही राजकारण करण्यात आले, याची खंत असल्याचे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी म्हटले. काळ कठीण आहे. या कठीण काळात नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत असताना त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखावी. काळ कठीण आहे. राजकारण बाजूला ठेवून या शहराच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन संघटित प्रयत्न करावे, प्रशासनाला साथ द्यावी, असे मार्मिक आवाहनही महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.


सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी सोशल मीडियाचा वापर करा:- महापौर

कोरोनाविषयीची भीती घालविण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, मदत कोठून आणि कशी मिळेल याची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. त्याचा उपयोग कुणाची बदनामी करण्यासाठी, लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी, भ्रम निर्माण करण्यासाठी करू नये. विधायक आणि सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उपयोग करावा. चाणाक्ष, चोखंदळ नागरिकांनी अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर द्यावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने