Top News

गोवरी गावात कोरोनाचा विस्फोट....



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
गोवरी:- राजुरा तालुक्यातील गोवरी येथे एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तापाने शुक्रवारी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने गोवरी येथे नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकाच दिवशी २१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १४ पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. मागील दोन आठवड्यांपासून गोवरी, रामपूर परिसरात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने शनिवारी गोवरी येथे तपासणी शिबिर घेतले व गावातील नागरिकांची अँटिजन चाचणी केली.

या तपासणीत गोवरी येथे एकाच दिवशी तब्बल २१ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. राजुरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवरी येथे सकाळी १० वाजतापासून ही तपासणी सुरू करण्यात आली. यात कढोली (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीनकुमार ओदेला, डॉ. सुरेश कुंभारे, डॉ. मिरावधीर, गाडगे, ढोके, सर्व आरोग्य सेविका, सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिलमिले, ग्रामविकास अधिकारी संजय तुरारे, ग्रामपंचायत सदस्य शिबिरात उपस्थित होते. गावातील नागरिकांना तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावात दवंडी देण्यात आली. दरम्यान गावातील जीवनावश्यक वस्तूचे दुकान वगळता इतर प्रतिष्ठान पूर्णपणे बंद करण्याच्या सूचनांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने