चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं.
मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशी राजकीय वर्तुळत त्यांची ओळख होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेसची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. काँग्रेसला महाराष्ट्रात पुढे नेण्याच्या कामात त्यांचा मोलाचा हातभार लागला होता. मुंबईमध्ये त्यांच्या नावाला असणारं वजन पाहता, मुंबई प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.